गौतम बचुटे/केज :- केज शहरापासून अवघ्या दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या तांदळे वस्तीवर सध्या नागरिक आणि जनावरांची पाण्यासाठी प्रचंड तडफड सुरू आहे. मात्र अद्याप शासनाने या पाणी टंचाईकडे लक्ष दिलेले नाही. तीनही बाजूंनी डोंगरांनी वेढलेली ही वस्ती अनेक योजनांपासून उपेक्षित आहे.

गावच्या आग्नेय दिशेला पाणीपुरवठ्यासाठी एक विहीर आहे. पण नोव्हेंबर महिन्यातच ती कोरडी ठाक पडली आहे. या विहिरीवर जाण्यासाठी डोंगर-दऱ्या उतरून जावे लागते. डोक्यावर हंडे आणि घागरी घेऊन उताराच्या आणि निसरड्या वाटेने वर वस्तीपर्यंत येणे ही एक मोठी कसरत असते. ज्या घरात तरुण आहेत, ते पाणी आणू शकतात. मात्र वृद्ध आणि लहान मुलांनी पाणी कसे आणायचे, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे तातडीने पाण्याचे टँकर देण्याची व्यवस्था होणे आवश्यक आहे.

स्वतःच्या पैशाने 9 ते 10 हजारांचा टँकर – मारुती तांदळे हे त्यांच्या मुलासोबत ऊस तोडणीसाठी तीनशे किलोमीटर अंतरावरील एका साखर कारखान्यावर गेले होते. वस्तीवर त्यांची पत्नी आणि नातवंडे आहेत. पत्नीने घरात पिण्यासाठी देखील पाणी नाही, असे त्यांना फोनवरून डोळ्यात अश्रू आणून कंठ दाटून रडत सांगितले. त्यानंतर मारुती तांदळे हे गावात आले. त्यांनी केजमधून एक टँकर भाड्याने घेऊन सुमारे नऊ ते दहा हजार रुपये स्वतःच्या खिशातून खर्च करून तो टँकर वस्तीपासून सुमारे एक ते दीड किलोमीटर डोंगरात असलेल्या विहिरीत सोडला आहे. त्यामुळे त्या विहिरीतील पाणी डोक्यावरून आणून किमान दहा ते पंधरा दिवस तरी तहान भागेल, अशी व्यथा त्यांनी व्यक्त केली.

पाणी साठवायला टाकीच नाही, रस्ताही नाही – वस्तीवर पिण्याच्या पाण्याची नळ योजना किंवा पाणी साठविण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे पाणी जरी टँकरने उपलब्ध झाले तरी साठवणुकीसाठी प्लास्टिक किंवा लोखंडी टाकी ठेवून पाणी साठवून ठेवावे लागेल. सध्या अशी कोणतीही सोय नाही. त्याचबरोबर केजहून कानडी, माळी, तारनाळीपर्यंत पक्का रस्ता आहे. मात्र त्यानंतर तारनाळीपासून अडीच ते तीन किलोमीटर अंतर हे कच्च्या रस्त्याने जावे लागते. हा रस्ता पूर्णपणे उखडलेला आहे. त्यामुळे टँकर आणायलाही मोठी अडचण येते.

शौचालय असून बाहेर,आंघोळीचे पाणी धुणी-भांड्यासाठी

वस्तीवर प्रत्येक कुटुंबात शौचालय बांधलेली असताना प्यायला जर पाणी नाही तर शौचालयासाठी कुठून आणणार, म्हणून नागरिकांना शौचासाठी बाहेर जावे लागते. तांदळे वस्तीवर पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने येथील नागरिक हे धुणी-भांड्यासाठी पुन्हा तेच आंघोळीचे पाणी वापरत आहेत. पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरावा लागत आहे.

अधिकारी आणि लोकप्रतिनिधी लक्ष कधी देणार

हायवेने दुष्काळी दौरे करणाऱ्या अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी अशा वस्त्यांवर जाऊन तेथील नागरिकांच्या व्यथा जाणून त्यांच्यासाठी उपाययोजना करायला हव्यात, अशी मागणी आता जोर धरत आहे.

ही बातमी वाचा….

Pratik Tarkase is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...