गौतम बचुटे, केज :- वडिलांचा विरोध असतानाही १८ वर्षीय तरुणाकडून जनावरे सांभाळण्याचे काम करवून घेऊन, त्याचा मानसिक छळ करून त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि ॲट्रॉसिटीसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केज तालुक्यातील सिद्धनाक रवि सिरसट हा केज येथील अखिल खतीब, खलील खतीब यांच्याकडे जनावरे सांभाळण्याचे काम करीत होता. अखिल खतीब त्याला कामाला घेऊन जात असल्याबाबत सिद्धनाक याचे वडील आणि कुटुंबियांचा विरोध होता. तरीसुद्धा अखिल खतीब त्याला पैशाची लालूच दाखवून बळजबरीने त्याच्याकडून काम करून घेत होते आणि त्याला कामाचे पैसे सुद्धा देत नव्हते, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

अखिलचा लहान भाऊ मुस्तकिन खलील खतीब हा त्याच्याकडून म्हशी धुवून घेणे, शेण काढणे व गोठा झाडून साफ करणे अशी कामे बळजबरीने करून घेत असे, असेही तक्रारीत म्हटले आहे.

त्यांच्या या त्रासाला कंटाळून दि. २६ नोव्हेंबर रोजी सिद्धनाक सिरसट याने केज येथील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे असलेल्या अखिल खतीब यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या लोखंडी अँगलला म्हशीच्या म्होरकीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणी मयत सिद्धनाक सिरसट याचे वडील रवि सिरसट यांच्या तक्रारीवरून अखिल खलील खतीब आणि मुस्तकिन खलील खतीब यांच्याविरुद्ध गु. र. नं. ७३२/२०२६, भा. न्या. सं. १०८ आणि ॲट्रॉसिटी कलम ३(२), ३(v) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम हे तपास करीत आहेत.

शवविच्छेदन इन कॅमेरा

आत्महत्येची घटना गंभीर असल्याने सिद्धनाक याचे शवविच्छेदन इन कॅमेरा करण्यासाठी त्याचे प्रेत स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई येथे हलविण्यात आले आहे.

“गुन्हेगारांना तात्काळ अटक करा”

“१२ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सिद्धनाक सिरसट यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी करून गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्यात यावी. रिपब्लिकन पार्टी त्यांच्या पाठीशी आहे.” –दीपक कांबळे, केज तालुका अध्यक्ष, रिपाइं

दीपक कांबळे

Pratik Tarkase is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...