केज : पशुपालकाकडे सालगडी म्हणून कामाला असलेल्या १८ वर्षीय तरुणाचा घराशेजारील पत्र्याच्या शेडमध्ये मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. सिद्धनाथ रवी शिरसाट असे मयत तरुणाचे नाव आहे. गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळून आला, मात्र त्याच्या पाठीवर मारहाणीचे स्पष्ट व्रण दिसत असल्याने नातेवाईकांनी हा केवळ आत्महत्येचा प्रकार नसल्याचा संशय व्यक्त केला आहे.

हा मृत्यू आत्महत्या आहे की त्याआधी झालेल्या मारहाणीचा परिणाम आहे, हाच आता सगळ्यात मोठा प्रश्न बनला आहे. एका १८ वर्षांच्या पोराने कामावर येऊन अवघ्या १५ दिवसांत टोकाचं पाऊल उचलावं, यावर नातेवाईकांचा विश्वास बसत नाही. जर त्याला आधी बेदम मारहाण झाली असेल, तर तो छळाला कंटाळून गेला असावा, अशी शंका आहे. त्यामुळे पोलिसांनी केवळ गळफास म्हणून हे प्रकरण बंद न करता, मारहाण कोणी, का केली, याचा सखोल तपास करणं गरजेचं आहे. ग्रामीण भागात सालगड्यांवर होणारा अन्याय अनेकदा दाबला जातो, त्यामुळे या प्रकरणात सत्य बाहेर येणं महत्त्वाचं आहे.

१५ दिवसांपूर्वीच कामाला लागला होता

केज शहरातील पशुपालक अखिल खतीब यांच्याकडे जनावरांची चारा-पाणी आणि देखभाल करण्यासाठी सिद्धनाथ शिरसाट हा १५ दिवसांपूर्वी सालगडी म्हणून कामाला राहिला होता. २६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२:१५ वाजण्याच्या सुमारास मालकाच्या घराशेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमधील लोखंडी अँगलला जनावरांच्या म्होरकीने त्याने गळफास घेतल्याची माहिती नातेवाईकांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली.

नातेवाईकांचा गंभीर आरोप

मयत सिद्धनाथच्या पाठीवर चामड्याचा बेल्ट किंवा तत्सम वस्तूने मारहाण केल्याचे व्रण स्पष्ट दिसत आहेत. मृत्यूपूर्वी त्याला बेदम मारहाण करून जीवे मारून गळफास देण्यात आला असावा, किंवा शारीरिक छळ व मारहाणीला कंटाळून त्याने टोकाचे पाऊल उचलले असावे, असा गंभीर संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नसून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाल्यावर पुढील गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Pratik Tarkase is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...