अंबाजोगाई/बीएन वृत्तसेवा: संविधान हे फक्त कायद्याचं पुस्तक नाही, तर प्रत्येक भारतीय नागरिकाचं रक्षण करणारं कवच कुंडल आहे. ते आपल्या हक्काचं, स्वातंत्र्याचं आणि सन्मानाचं रक्षण करतं, असं मत ॲङ माणिक आदमाने यांनी व्यक्त केलं. संविधान दिनानिमित्त अंबाजोगाईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तीगृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमात वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना संविधानाचं महत्त्व पटवून देण्यात आलं. यावेळी मंचावर शिक्षक प्रशांत मस्के, प्रा. पी. एस. तरकसे, अविष्कार गोरे, सरवदे, हनुमंत ढाले हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचं सामूहिक वाचन केलं आणि मूल्यांचं जतन करण्याचा संकल्प केला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक आदित्य कांबळे, प्रथमेश उपाडे, अक्षरदीप कसबे, रोहित बनसोडे, विनोद देवळे, आविष्कार गोरे, विजय कसबे, रोहन कारेपुरकर, किशोर पारधे, विशाल प्रभाळे, विशाल खरात, रत्नदीप मगर, ओम कांबळे, गौरव लोंढे, प्रतीक गवई, सागर शेलार, दिनेश पाडुळे, शासकीय कर्मचारी सत्यजीत वावळे, हनुमंत ढाले यांनी प्रयत्न केले.
संविधान फक्त वाचायचं नाही, जगायचं आहे
यावेळी बोलताना ॲङ आदमाने म्हणाले, संविधान हे कपाटात ठेवून पूजायचं पुस्तक नाही, तर रोजच्या जगण्यात वापरायचं शस्त्र आहे. ते आपल्याला अन्यायाविरुद्ध उभं राहायला शिकवतं. “वस्तीगृहात राहणाऱ्या मुलांनो, तुम्ही इथे फक्त पदवीसाठी आलेला नाहीत. बाबासाहेबांनी तुम्हाला संविधानाच्या रूपाने ताकद दिली आहे. ती ताकद ओळखा. कोणी तुमच्यावर अन्याय करत असेल, तर घाबरू नका. संविधान तुमच्या पाठीशी आहे, हे लक्षात ठेवा. पण फक्त हक्क मागून चालणार नाही, तर अभ्यास करून स्वतःच्या पायावर उभं राहणं, हेच खरं संविधानाचं पालन आहे.”
समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय हीच संविधानाची ताकद

यावेळी प्रशांत मसके यांनी ही संविधानाचे महत्व उपस्थित विद्यार्थ्यांना सांगीतले. यावेळी बोलताना प्रा. पी. एस. तरकसे म्हणाले, संविधानाने आपल्याला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही चार मुल्ये दिली आहेत. धर्म, जात, लिंग, भाषा, प्रदेश काहीही असो, प्रत्येकाला समान अधिकार आहे. गरीब असो किंवा श्रीमंत, संविधानापुढे सगळे समान आहेत. हेच आपल्या लोकशाहीचं खरं बळ आहे.
