अंबाजोगाई/बीएन वृत्तसेवा:- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), बीड संचलित अंबाजोगाई लोकसंचलित साधन केंद्र (CMRC) यांच्या माध्यमातून अंजली महिला बचत गटातील महिलांनी स्वबळावर उभारलेल्या R. S. डाळ मिलला मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी महिलांनी एकत्रित प्रयत्नांतून उभारलेल्या उद्योगाची पाहणी करून त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले.
या भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहाय्यक तथा मंत्रालयातील प्रशासकीय अधिकारी राजेश खंदारे, मंडळ अधिकारी गरड, तहसीलदार विलास पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी स्वामी आणि गटविकास अधिकारी बळवंत उपस्थित होते. याप्रसंगी अंजली महिला बचत गटाच्या अध्यक्षा शोभा आदमाने व बचत गटातील महिला सदस्य, CMRC व्यवस्थापक मीना ज्ञानोबा कांबळे, CMRC लेखापाल स्वप्नील वसंतराव वाघमारे, CMRC उपजीविका सल्लागार शार्दुल अरुण वाघमारे, CMRC सहयोगिनी अनुराधा काशिनाथ नरवडे तसेच CMRC प्रेरक कांता केरबा कांबळे उपस्थित होत्या.
बचत गटातून थेट उद्योगाकडे
महिला बचत गट म्हणजे फक्त पैसे जमा करणे, हे चित्र आता बदललं आहे. अंजली बचत गटाच्या महिलांनी बचतीतून थेट स्वतःचा डाळ मिल उभा केला. हा बदल खूप महत्त्वाचा आहे. बचतीचे पैसे उद्योगात लावले की रोजगारही मिळतो आणि कुटुंबालाही आधार मिळतो. हीच खरी महिला आर्थिक विकासाची दिशा आहे.
मान्यवरांची भेट म्हणजे महिलांना मोठं बळ
महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी उद्योग क्षेत्रात घेतलेली भरारी, स्वावलंबनासाठी केलेले प्रयत्न आणि एकजुटीच्या बळावर उभारलेला हा डाळ मिल उद्योग पाहून मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. महिलांनी अशाच प्रकारे उद्योगाची प्रगती साधत इतर महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण करावे, असे सांगत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. R. S. डाळ मिल हा महिलांच्या जिद्दीचा, एकजुटीचा आणि कर्तृत्वाचा प्रेरणादायी नमुना ठरत आहे. अशी भेट मिळाली की महिलांचा आत्मविश्वास वाढतो आणि इतर महिलांनाही उद्योग करायची प्रेरणा मिळते.
