गौतम बचुटे/केज: – केज-धारूर रस्त्यावर कासारी फाट्याजवळ दोन मोटारसायकलच्या अपघातात पती-पत्नी जखमी झाल्याची घटना दि. शुक्रवारी दि.27 घडली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
पुणे जिल्ह्यातील विठ्ठलवाडी (ता. इंदापूर) येथील राजू बबन जमदाडे आणि त्यांची पत्नी उमा राजू जमदाडे हे दोघे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथून पाहुण्याच्या मृत्यूनंतरचे क्रियाकर्म आटोपून त्यांच्या मूळ गावी विठ्ठलवाडीकडे जात होते. ते मोटारसायकल क्र. (एमएच ४२ / बीव्ही ७९१८) वरून केज-कळंब रोडने जात होते.
चालक बोलत होता मोबाईलवर
केजपासून जवळ असलेल्या कासारी पाटीजवळ समोरून येणारी मोटारसायकल क्र. (एमएच ४४ / वाय ८५२८) चा चालक मोबाईलवर बोलत, भरधाव वेगाने, हयगय व निष्काळजीपणे मोटारसायकल चालवत येऊन त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात राजू जमदाडे व त्यांची पत्नी उमा जमदाडे हे दोघेही गाडीवरून खाली पडून जखमी झाले.त्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, केज येथे दाखल केले.राजू जमदाडे यांच्या तक्रारीवरून मोटारसायकल क्र. (एमएच ४४ / वाय ८५२८) च्या चालकाविरुद्ध गु.र.नं. ७३५/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम मुरकुटे तपास करत आहेत.
