गौतम बचुटे/केज: केज तालुक्यातील नागझरी परिसरात बिबट्या दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दि. २८ नोव्हेंबर रोजी शेतकरी पांडुरंग महादेव चौरे यांना वडाजाई देवीच्या मंदिरासमोर असलेल्या त्यांच्या शेतात बिबट्या दिसला. यानंतर गावकऱ्यांनीही बिबट्याला झाडीत वावरताना पाहिले. सरपंच चंद्रसेन चौरे यांनी त्याचा व्हिडिओ टिपला आहे.
नागझरी हे गाव बालाघाट डोंगराच्या पायथ्याशी आहे. त्यामुळे या भागात वन्यप्राण्यांचा वावर नेहमीच असतो. सध्या रब्बीचा हंगाम सुरू असल्याने शेतकरी सकाळी लवकर आणि संध्याकाळी उशिरापर्यंत शेतात असतात. त्यातच बिबट्या दिसल्याने शेतात जाण्यास शेतकरी घाबरत आहेत. लहान मुले, महिला आणि पाळीव जनावरांच्या सुरक्षेची चिंता गावकऱ्यांना सतावत आहे.
बिबट्या नवीन नाही, तो याच भागातला आहे
या बिबट्याचा वावर गेल्या चार-पाच वर्षांपासून या भागात आहे. तो बाहेरून आलेला नसून येथीलच अधिवासात वाढलेला आहे. त्यामुळे त्याला हुसकावून लावणे सोपे नाही. शेतकऱ्यांनी त्याच्यासोबत सावधगिरीने राहणे हाच कायमचा उपाय आहे.
अद्याप हल्ला नाही, पण धोका कायम आहे.
आतापर्यंत या बिबट्याने कोणत्याही माणसावर किंवा प्राण्यावर हल्ला केलेला नाही. ही दिलासादायक बाब आहे. मात्र बिबट्या झाडीतच वावरत असल्याने शेतकऱ्यांची भीती कमी होत नाही. वन विभागाचे पथक पाहणी करत आहे, पण केवळ पाहणी पुरेशी नाही. शेतकऱ्यांनी एकटे शेतात जाऊ नये, लहान मुलांना पाठवू नये आणि बिबट्या दिसल्यास जवळ न जाता वन विभागाला कळवावे, हेच सध्या महत्त्वाचे आहे.
“या बिबट्याचा जन्म हा याच भागात झालेला आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून या क्षेत्रात बिबट्याचा वावर आहे. त्याच्या भक्ष्याच्या शोधात त्याचा दहा किमी परिघाच्या क्षेत्रात वावर असतो. तो वनविभागाच्या क्षेत्रात तो आहे. मात्र अद्याप त्याने कोणत्याही मनुष्य प्राण्यावर हल्ला केलेला नाही.”
सी. आर. मुंडे, वनरक्षक, धारूर वन उपविभाग
ही बातमी ही वाचा…
