देवीदास वाघमारे.

अंबाजोगाई / बीएन वृत्तसेवा : कॉपी करून मिळवलेले १०० गुण असण्यापेक्षा प्रामाणिकपणे मिळवलेले ४० गुण जास्त मोठे असतात. कारण कॉपीमुळे फक्त मार्कशीट मिळते, पण आयुष्य घडत नाही, असे स्पष्ट मत सेवानिवृत्त अधिकारी तथा जयकिसान विद्यालयाचे माजी विद्यार्थी देवीदास वाघमारे यांनी व्यक्त केले.

अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव येथील जयकिसान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शनिवारी दि. २८ रोजी कै. शेषरावजी (आप्पा) शिंदे स्मृती समारोह आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्रा. जयजीत शिंदे होते. तर मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकारी देवीदास वाघमारे, कृषी सहाय्यक पंडित काकडे, शाळेचे मुख्याध्यापक प्रा. एन. के. हजारे, डी. डी. काकडे, ए. एन. घाटूळे, पुरस्कारार्थी दिलीप तट, विष्णू भारती, कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विठ्ठल देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अध्यक्षीय समारोप करतांना प्रा. जयजीत शिंदे यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. व्ही. देशमुख यांनी केले. पाहुण्यांचा परीचय डी. यु. काळे यांनी करुन दिला तर सर्वांचे आभार प्रा. पी. एस. तरकसे यांनी मानले.

शिक्षणासाठी दोन रुपये नव्हेत

या विद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले देवीदास वाघमारे यांनी आपल्या जुन्या आठवणी सांगितल्या. त्यावेळी दोन रुपये वेळेवर नसल्यामुळे  प्राथमिक शाळेचा दाखला घेण्यासाठी चार वर्षे वाट पाहावी लागली, असे त्यांनी सांगितले. पुढे जयकीसान  विद्यालयात व वसतीगृहात शेषराव आप्पांनी दिलेल्या संस्कारांमुळे शिक्षणाचा पाया भक्कम झाला. आप्पांच्या वसतिगृहातील शिस्तीचाही त्यांनी उल्लेख केला. रोज सकाळी ४ ते ६ अभ्यास, वेळेवर घंटी, पहाटे धावण्याचा व्यायाम आणि नदीवर आंघोळ, या शिस्तीमुळेच खेड्यातील मुलं घडली, असे ते म्हणाले.

खेड्यातील मुलांची उंच भरारी

ग्रामीण पार्श्वभूमीतून पुढे येताना अनेक अडचणी आल्या. तरीही हार न मानता देवीदास वाघमारे यांनी  प्रथम रेल्वेत, नंतर प्रदूषण नियंत्रण मंडळात सेवा केली. २०१३ मध्ये दर शनिवार-रविवारी मुंबई ते जळगाव असा ४०० किलोमीटरचा प्रवास करून त्यांनी पार्ट-टाइम एम. टेक. पूर्ण केले. याच शाळेतील शिवाजी पाखरे हे सुरुवातीला गणितात कच्चे होते, आज ते इंग्रजीवर प्रभुत्व मिळवून क्रीडा क्षेत्रात भुसावळ ते मलेशियापर्यंत भारताचे नाव उज्ज्वल करत आहेत, असेही वाघमारे यांनी अभिमानाने सांगितले.

              पुरस्कार प्रदान

यावेळी आप्पाच्या नावे दिला जाणार आदर्श शिक्षक पुरस्कार देवळा येथील जि. प. शाळेचे मुख्याध्यापक दिलीप तट यांना तर कै. अमऋषी प्रयोगशील शेतकरी पुरस्कार कोपरा येथील शेतकरी विष्णू भारती यांनी सपत्नीक देण्यात आला.

पतसंस्थेच्या वतीने पुरस्कार
पतसंस्था.

यावेळी  श्रीनिवासा पतसंस्थेच्या वतीने प्रा. जयजीत शिंदे यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सपत्नीक सन्मान करण्यात आला. यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष एन. के. हजारे, उपाध्यक्ष सुशांत हजारे, सेनापती सुरवसे व तोडकर उपस्थित होते.

ही बातमी ही वाचा…

Pratik Tarkase is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...