वरिष्ठ सहायकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल
अंबाजोगाई/प्रतिनिधी:
अंबाजोगाई येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालयात कोट्यवधी रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वरिष्ठ सहायक (रोखपाल) पदाचा गैरवापर करून तब्बल १ कोटी ७५ लाख ४ हजार ७२३ रुपयांची शासकीय रक्कम हडप केल्याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालयात १९ मार्च २०२० ते ३० जून २०२६ या कालावधीत हा अपहार घडला. याप्रकरणी उपअभियंता राजेंद्र बाबुराव काळे (वय ५७, रा. रिंग रोड, छत्रपती नगर, अंबाजोगाई) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी राहुल रावसाहेब देशमुख (वय ४९, रा. प्रशांत नगर, मनिष स्वीट होम पाठीमागे, अंबाजोगाई) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी राहुल देशमुख याने शासकीय कर्तव्यावर असताना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वरिष्ठ सहायक (रोखपाल) या पदाचा दुरुपयोग केला. कार्यालयातील मॅन्युअल कामगारांच्या भविष्य निर्वाह निधी (PF) व फरकाच्या हप्त्यांच्या लाभाच्या रकमा, तसेच कार्यालयीन धनादेशावर फिर्यादी उपअभियंता यांच्या बनावट सह्या करून रोखीने व आरटीजीएसद्वारे स्वतःच्या व इतर व्यक्तींच्या खात्यावर वळवून घेतल्या. तसेच रोखीने व आरटीजीएस केलेल्या शासकीय रकमेच्या खोट्या नोंदी कॅशबुकमध्ये नोंदवून बनावट अभिलेख तयार केले आणि शासन व फिर्यादी यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. प्राथमिक अंदाजानुसार अपहार झालेली रक्कम १ कोटी ७५ लाख ४ हजार ७२३ रुपये असून तपासात ही रक्कम कमी-जास्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. शासकीय निधीचा एवढा मोठा घोटाळा उघडकीस आल्याने प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषदेचा बांधकाम उपविभाग हा ग्रामीण भागातील विकास कामांसाठी महत्त्वाचा मानला जातो. या विभागामार्फत रस्ते, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी इमारती आणि पाणीपुरवठा योजनांची कामे केली जातात. यासाठी शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त होतो. या निधीचा विनियोग नियमानुसार होणे अपेक्षित असते. मात्र प्रत्यक्ष काम न करताच किंवा कमी काम करून जास्त बिले काढून निधीचा अपहार होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही समोर आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
