विश्वजीत गंडले/बर्दापूर:
अंबाजोगाई तालुक्यातील उजणी येथील महावितरणच्या सबस्टेशनला अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य करत पॉवर ट्रान्सफॉर्मरमधील तब्बल २ लाख रुपये किमतीची तांब्याची कॉईल चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महावितरणच्या सुरक्षित आवारातून इतक्या मोठ्या प्रमाणावर तांब्याची चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, उजणी येथील महावितरण शाखा कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या सबस्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याने पाळत ठेवून प्रवेश केला. ही घटना दिनांक १ जून २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजेपासून ते दिनांक १५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजेदरम्यान घडल्याचे नमूद करण्यात आले आहे. चोरट्याने सबस्टेशनमधील मुख्य पॉवर ट्रान्सफॉर्मरची तोडफोड करत त्यातील तब्बल १ हजार किलो वजनाची तांब्याची कॉईल शिताफीने लंपास केली. बाजारात सुमारे २०० रुपये प्रति किलो दराने या चोरीस गेलेल्या तांब्याच्या कॉईलची एकूण किंमत २ लाख रुपये इतकी भरते.
कनिष्ठ अभियंत्यांची पोलिसांत धाव
सबस्टेशनमधील पॉवर ट्रान्सफॉर्मरमधील साहित्य चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर महावितरण प्रशासनाने अंतर्गत पाहणी केली. त्यानंतर महावितरण शाखा उजणी येथे कार्यरत असलेले कनिष्ठ अभियंता ओमकार सुभाष तारळकर (वय २९ वर्षे, रा. माऊली नगर, यशवंतराव चव्हाण चौक, अंबाजोगाई) यांनी बर्दापूर पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष उपस्थित राहून याप्रकरणी अधिकृत फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून बर्दापूर पोलिसांनी दिनांक २९ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १४:०४ वाजता अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास ठाणे अंमलदारांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राठोड हे करत आहेत. महावितरणच्या सबस्टेशनमधून तांबे चोरी करणाऱ्या या टोळीचा लवकरात लवकर शोध घ्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून केली जात आहे.
