अंबाजोगाई (प्रतिनिधी): अंबाजोगाई तालुक्यातील चनई ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. ग्रामपंचायत कर वसुली आणि फेरफार नोंदीच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक लूट केली जात असून, दोषी ग्रामसेवक आणि उपसरपंचावर तातडीने गुन्हे दाखल करून निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी अंबाजोगाई शाखेच्या वतीने उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. मागण्या मान्य न झाल्यास ८ ऑक्टोबर २०२६ पासून उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनातील प्रमुख आरोप असे –

१. कर व फेरफार नोंदीच्या नावाखाली मनमानी वसुली:
ग्रामसेवक लक्ष्मण महादेव देशमाने आणि उपसरपंच संगनमताने नागरिकांची पिळवणूक करत आहेत. गावात नियमित पाणीपुरवठा व वीजपुरवठा नसतानाही अवाजवी कर वसुली केली जात असल्याचा आरोप आहे.

२. प्लॉटधारकांकडून खंडणीसदृश वसुली:
शासकीय नियमानुसार फेरफार (PTR) नोंदीसाठी रेडीरेकनरच्या केवळ १% रक्कम घ्यावी लागते. मात्र, अंतिम ले-आउट मंजूर असूनही प्रत्येक प्लॉटच्या नोंदीसाठी ५ ते १० हजार रुपयांची मागणी केली जाते. पैसे न दिल्यास नोंद अडवून ठेवली जाते.

३. जाब विचारणाऱ्यांना गुन्ह्याची धमकी:
या लुटीबाबत कोणी जाब विचारल्यास शासकीय कामात अडथळा (कलम ३५३) व खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जाते.

४. शासकीय निधीचा अपहार:

  • मागासवर्गीय निधी: ग्रामपंचायत उत्पन्नातील १५% निधी गेल्या ८ ते १० वर्षांपासून खर्च न करता हडप करण्यात आला.
  • दिव्यांग व आंतरजातीय विवाह निधी: २०१० पासूनचा हा निधी लाभार्थ्यांना वाटप न करताच लाटण्यात आला.
  • घरकुल योजना: रमाई आवास आणि पीएम आवास योजनेत घरांचे बांधकाम न करताच लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करून अफरातफर करण्यात आली.

या सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित ग्रामसेवकाला निलंबित करावे आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.