अंबाजोगाई-: गणपती गेले, गौरी गेल्या की प्रत्येक कुटुंबातील निर्माल्य नदीत, बारवात किंवा रस्त्यावर फेकणे, हे आपल्याकडे सर्रास घडते. यातूनच नदीचे पाणी दूषित होते. बारव, विहिरी बुजतात आणि शहरात दुर्गंधी पसरते. पण याच प्रथेला छेद देत श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या २४०० विद्यार्थ्यांनी भक्तीला पर्यावरणाची आणि गोसेवेची जोड देत संपूर्ण समाजासमोर एक अनोखा आदर्श ठेवला.


गणेशोत्सव आणि महालक्ष्मी उत्सवानंतर शहरात मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होते. हे निर्माल्य नदीत, विहिरीत पडून जलप्रदूषण होऊ नये. म्हणून विद्यालयाने अनोखा संकल्प केला. हा संकल्प शालेय समितीचे अध्यक्ष अविनाश मुडेगावकर यांच्या संकल्पनेतून राबविला . मुख्याध्यापक अनंतराम कोपले यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याध्यापक संदिप देशमुख , पर्यवेक्षक सूर्यकांत उजगरे, प्रेमल खंडागळे ,अभ्यास पूरक मंडळ प्रमुख श्रीकांत देशपांडे सहप्रमुख ज्योती शिंदे ठाकूर,प्रकल्प प्रमुख म्हणून मनोज कराड , सुरेश मुंडे व सर्व शिक्षकांनी या मोहिमेत सहभाग घेतला. प्रत्येक विद्यार्थ्याने १० घरी जाऊन असे एकूण सुमारे शहरातील २४ हजार कुटुंबातील निर्माल्य संकलित केले. या निर्माल्यात दुर्वा, झेंडूची फुले, आणि कापसाच्या वस्त्रमाळी होत्या.
हे सर्व निर्माल्य शाळेत आणल्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांनी या निर्माल्याचे तीन भागात वर्गीकरण केले.
दुर्वा – गोमातेच्या मुखात:
गणरायाला सर्वात प्रिय असलेली दुर्वा वेगळी काढून स्वच्छ करून ती थेट गोशाळेला देण्यात आली. दुष्काळाच्या काळात चारा टंचाईने त्रस्त असलेल्या गोशाळेसाठी हा दुर्वा पौष्टिक चारा ठरला. भक्तीचा प्रसाद थेट मुक्या जीवांच्या पोटात गेला. हा झाला भक्ती आणि गोसेवेचा संगम.
झेंडूची फुले – डोंगर पिवळा होणार:
जमा झालेली हजारो झेंडूची फुले विद्यार्थ्यांनी डोंगरात आणि शहरालगतच्या माळरानावर नेऊन चुरगळून टाकली. पाऊस पडल्यानंतर यातील बियांपासून झेंडूची रोपे उगवणार आहेत. येत्या काही महिन्यांत हा ओसाड डोंगर पिवळाधमक फुलांनी बहरून जाणार आहे. कचरा समजून फेकल्या जाणाऱ्या फुलातून निसर्ग सजणार आहे.

समाजाला संदेश काय?
निर्माल्य ही कचरा नाही, ती संपत्ती आहे. त्याचे योग्य व्यवस्थापन केले तर प्रदूषण टाळता येते.आपण वाहिलेली एक दुर्वांची जुडी जरी गोशाळेत गेली तरी एका मुक्या जीवाचे पोट भरू शकते.
देवाला वाहिलेले फूल नदीत फेकण्यापेक्षा मातीत रुजवले तर त्यातून पुन्हा निसर्ग फुलतो.२४०० विद्यार्थ्यांनी दाखवून दिले की मोठे भाषण किंवा मोठा निधी नसतानाही फक्त इच्छाशक्तीच्या जोरावर शहराचे प्रदूषण रोखता येते. प्रशासनानेही अशा उपक्रमांना प्रोत्साहन देऊन प्रत्येक शाळेत हा उपक्रम राबवावा, अशी मागणी आता पालकांमधून होत आहे.
हा फक्त निर्माल्य संकलनाचा उपक्रम नाही, तर पुढच्या पिढीला पर्यावरणपूरक सण कसे साजरे करावेत, याचे विद्यार्थ्यांनी दिलेले जिवंत प्रबोधन आहे.