अंबाजोगाई / बीएन प्रतिनिधी: सामाजिक वनीकरण विभाग, बीड तथा सामाजिक वन परिक्षेत्र, अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताहानिमित्त कै. वसंतराव नाईक प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा, आनंद नगर, अंबाजोगाई येथे आज मंगळवार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी वन्यजीव संवर्धन व पर्यावरण जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस. ए. राठोड होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण, अंबाजोगाई एस. जी. वरवडे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर वनपाल एस. एम. टाकणखार, बी. पी. पवार, श्रीमती पी. ए. खरात, श्रीमती एस. व्ही. पाखरे तसेच वनरक्षक बी. आर. दहिफळे यांची प्रमुख उपस्थिती होती. विशेष अतिथी म्हणून पक्षीमित्र रत्नाकर निकम व पर्यावरण अभ्यासक सदानंद वालेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देशमुख पी. आर. यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भविष्यवेधी शिक्षण प्रबंधन समिती व सांस्कृतिक विभागातील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग:

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भाषण, सादरीकरण, प्रश्नोत्तर या माध्यमातून वन्यजीव संवर्धनाचा संदेश दिला. वन्यजीव सप्ताहाचा उद्देश काय? वन्यजीवांचे पर्यावरणातील महत्त्व, जैवविविधतेचे संवर्धन, वनांचे संरक्षण आणि मानव-वन्यजीव संघर्ष या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रात काम करताना आलेले अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. वन्यप्राण्यांचे संरक्षण कसे करावे, वनसंपदेचे महत्त्व काय, पक्षी आणि इतर जीवसृष्टीचे पर्यावरणातील योगदान याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना अधिकाऱ्यांनी समजेल अशा भाषेत उत्तरे दिली.

निसर्गाचे रक्षण म्हणजे भविष्याचे रक्षण

या कार्यक्रमाच्या माध्यमातून “वन्यजीव वाचवा, निसर्ग वाचवा” आणि “जैवविविधतेचे संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे” हा संदेश विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यात आला. कार्यक्रमाची सांगता “निसर्गाचे रक्षण म्हणजे आपल्या भविष्याचे रक्षण” या संदेशाने करण्यात आली.

D. Sadanand is a new rural correspondent from Ambajogai taluka, Beed district. He recently joined Beed News Express to cover rural areas of Ambajogai, focusing on village news, local events, and social...