धारुर (प्रतिनिधी) – बीड जिल्ह्यातील व धारुर तालुक्यातील आडस या गावात सध्या घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गावातील मुख्य रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ग्रामपंचायत मात्र या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

आडस येथील मुख्य रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून कचऱ्याचे ढीग साचले आहेत. प्लास्टिक, घरगुती कचरा, कुजलेले पदार्थ रस्त्यावरच टाकले जात आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्यावरून दररोज शाळकरी मुले, महिला आणि वृद्ध नागरिकांची ये-जा असते. कचऱ्यामुळे रस्ता निम्मा बंद झाला असून अपघाताचा धोका देखील निर्माण झाला आहे. पावसाळ्यात ही घाण वाहून घरांमध्ये शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्रामस्थांनी मागणी केली आहे की, ग्रामपंचायतीने तात्काळ या ठिकाणचा कचरा उचलून योग्य ठिकाणी कचरा डेपो तयार करावा आणि नियमित स्वच्छता मोहीम राबवावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील नागरिकांनी दिला आहे.

नागरिकांमध्ये संताप

“आम्ही अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे तक्रार केली, पण कोणी लक्ष देत नाही. स्वच्छ भारत अभियान फक्त कागदावरच आहे का?” असा सवाल एका स्थानिक नागरिकाने उपस्थित केला.सध्या साथीच्या आजारांचे प्रमाण वाढत असताना अशा घाणीमुळे डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांचा धोका वाढला आहे. लहान मुलांच्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.

दिवाळी सणाच्या तोंडावर साफसफाईची मागणी

दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आला असताना परिसरात अशी घाण असणे लाजिरवाणे असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. सणासुदीच्या काळात पाहुणे-रावळे गावात येत असतात, अशा वेळी गावाची अशी अवस्था पाहून गावाची बदनामी होत आहे. त्यामुळे दिवाळी सणाच्या तोंडावर तरी ग्रामपंचायतीने या परिसराची तात्काळ साफसफाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...