सदानंद /अंबाजोगाई : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जमिनीवर झाडे लावून ती जगवण्यासाठी पाणी, खत घालून मोठी कसरत करावी लागते; तरीही अनेकदा झाडे जगत नाहीत. मात्र ज्या सिमेंट-काँक्रीटच्या पुलावर केवळ वाहने धावणे अपेक्षित आहे, तिथे कोणतीही निगा नसताना झाडा-झुडपांचे साम्राज्य उभे राहिले आहे. अंबासाखर येथील उड्डाणपुलावर सध्या हीच थक्क करणारी आणि तितकीच धोकादायक स्थिती निर्माण झाली असून प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा कोट्यवधींचा पूल धोक्याच्या छायेत सापडला आहे.
अंबा साखर कारखान येथे उड्डाणपुल बांधण्यात आला असून यामुळे लातुर कडे लवकर जाता येते. या पुलाची देखभाल व दुरुस्ती नसल्याने पुलाची वाईट अवस्था झाली आहे. उड्डाणपुलाच्या मुख्य संरक्षक भिंतीच्या सिमेंट ब्लॉकच्या फटींमध्ये चक्क पिंपळाचे झाड रुजले असून ते दिवसेंदिवस मोठे होत आहे. पिंपळाची मुळे सिमेंट फोडून आत जातात, त्यामुळे पुलाला तडे जाण्याची भीती आहे. तर उड्डाण पुलाच्या वरच्या रत्यावर बाभळी व इतर झाडे बहरु लागली आहेत. पाणी नसल्याने जमीनीवरील झाडे वाळत आहेत. परंतू पुलावरील झाडे जोमाने वाढत असली तरी पुलाच्या मजबुतीला धोका निर्माण करीत आहेत.
टोलवसुली जोरात, पण देखभालीत ठणठणपाळ
वाहनधारकांकडून टोल वसूल केला जातो, पण पुलाची साधी झाडे काढण्याची कामेही होत नाहीत. तसेच रत्यावरही अनेक ठिकाणी खड्डे पडलेली आहेत.
अपघाताचा सापळा
पुलावर खडी आणि वाळू साचली आहे, त्यामुळे गाड्या घसरून अपघात होत आहेत. रात्री येथे दारू पार्ट्या होतात, काचेच्या बाटल्यांचा खच पडला आहे. प्रशासनाने तात्काळ झाडे मुळासकट काढून पूल स्वच्छ करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.
