गौतम बचुटे/केज:
तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असून, तोडलेल्या लाकडाची आरा मशीनपर्यंत अवैध वाहतूक राजरोसपणे सुरू आहे. यावर प्रशासनाचा कोणताच वचक राहिला नसल्याचा आरोप वृक्षप्रेमींमधून होत आहे.
जंगल क्षेत्र कमी झाल्याने पर्जन्यमान घटत असून तालुक्याला अवर्षण आणि दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. याचा थेट परिणाम शेती उत्पादनावर झाला असून पशुधनही कमी झाले आहे. असे असताना शेतातील मोठमोठी झाडे तोडली जात आहेत. तोडलेले वृक्ष रात्रीच्या वेळी पिकअप आणि ट्रॅक्टरमधून आरा मशीनपर्यंत नेले जातात. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे. याबाबत वृक्षप्रेमींनी अवैध वृक्षतोड तात्काळ रोखण्याची मागणी केली आहे.
“सुबाभूळ आणि निलगिरी या दोन प्रकारच्या झाडांच्या तोडीसाठी शेतकऱ्यांना परवानगीची आवश्यकता नाही. मात्र इतर झाडांची विनापरवाना तोड बेकायदेशीर आहे” – ईश्वर गुणावत,( वन परिक्षेत्र अधिकारी, धारूर)
