विश्वजीत गंडले/घाटनांदूर: दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असतानाही घाटनांदूर येथील मुख्य फटाका बाजारात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. दरवर्षी ग्राहकांच्या गर्दीने फुलून जाणारा हा बाजार यंदा दुष्काळामुळे ओस पडला आहे. ग्राहकच फिरकत नसल्याने फटाका विक्रेते चिंतेत सापडले आहेत.

यंदा अंबाजोगाई तालुक्यासह घाटनांदूर परिसरात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या हातात पैसाच नाही. शेतीमालाला भाव नाही आणि दुष्काळामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांचा कल फटाक्यांपेक्षा जीवनावश्यक वस्तूंकडे अधिक आहे. त्याचा थेट परिणाम फटाका बाजारावर झाला आहे.दरवर्षी दसऱ्यापासूनच या बाजारात दुकाने थाटली जातात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण फटाके खरेदीसाठी गर्दी करतात. मात्र यंदा चित्र वेगळे आहे. दुकानांमध्ये विविध प्रकारचे आकर्षक फटाके, फुलबाज्या, रॉकेट उपलब्ध असूनही खरेदीदारच नाहीत. दिवसभर दुकानदारांना रिकामे बसून ग्राहकांची वाट पाहावी लागत आहे.दुष्काळामुळे केवळ शेतकरीच नाही तर छोटे व्यापारी देखील अडचणीत आले आहेत. फटाक्यांच्या वाढत्या किमती आणि ग्राहकांची घटती संख्या यामुळे यंदा अनेक दुकानदारांना तोटा सहन करावा लागण्याची भीती आहे. आता ऐन दिवाळीत तरी ग्राहकांची वर्दळ वाढेल अशी आशा दुकानदारांना आहे.

“दरवर्षी या वेळेपर्यंत आमची अर्धी विक्री झालेली असते. पण यंदा दुष्काळामुळे लोकांकडे पैसेच नाहीत. ग्राहक येतात, दर विचारतात आणि निघून जातात. दिवाळी जवळ आली तरी बाजारात तेजी नाही.” -उत्सव जाधव (फटाके विक्रते, घाटनांदुर)

* उत्सव जाधव (फटाके विक्रते, घाटनांदुर)

व्हिडिओ बातमी

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...