गौतम बचुटं/केज: तीस लाख रुपये खंडणी द्या, अन्यथा जेसीबी जाळून टाकू, अशी धमकी देऊन आवादा पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी सुरक्षा रक्षकासह तिघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथे घडली आहे.

जिवाचीवाडी येथील गट नंबर ४९६, ४९७, ४९८, ४९९, ५०० मध्ये प्रभू नारायण सारुक आणि प्रमिला प्रभू सारुक यांच्या शेतात आवादा एनर्जी प्रा. लि. कंपनीचे पवनचक्की उभारणीचे काम सुरू आहे.दि. ३ नोव्हेंबर रोजी दुपारी १:३० वाजता कंपनीचे वरिष्ठ अधिकारी विशाल जयप्रकाश शेलार, दत्ता टिंगरे, अक्षय टेकाळे, नितीन कांबळे आणि मजूर पोलीस संरक्षणात जेसीबी घेऊन कामासाठी गेले असता, प्रभाकर नारायण सारुक आणि त्यांच्या पत्नी प्रमिला प्रभाकर सारुक यांनी काम अडविले.

अधिकाऱ्यांनी त्यांना जमिनीचा मोबदला दिल्याचे सांगून काम अडवू नका असे सांगितले. मात्र त्यांनी पैसे मिळाले नसल्याचे सांगत ३० लाख रुपये रोख आणि मुलाला कंपनीत नोकरी देण्याची मागणी केली. मागणी पूर्ण न केल्यास कामावरील जेसीबी जाळून टाकण्याची धमकी दिली. तसेच पोलिसांसमक्ष कंपनीच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी विशाल शेलार यांच्या तक्रारीवरून प्रभाकर नारायण सारुक, प्रमिला प्रभाकर सारुक आणि त्यांचा मुलगा मच्छिंद्र प्रभाकर सारुक यांच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६९५/२०२६ अन्वये BNS कलम १०८(२), ३५१(२), ३५२, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश आघाव पुढील तपास करीत आहेत.

सुरक्षा रक्षकच निघाला आरोपी

या गुन्ह्यातील आरोपी मच्छिंद्र सारुक हा आवादा कंपनीतच सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. त्यानेच आई-वडिलांना फोन करून काम बंद करण्यास सांगितल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gautamba Bachute is the District Crime Correspondent for Beed News Express, handling the most critical crime reporting for the district. With 25+ years of experience in field journalism, he is an expert...