गौतम बचुटे/केज: बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केज तालुक्यातील कानडी बदन येथे जय किसान आत्मा शेतकरी गटातील शेतकऱ्यांसोबत अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी केली.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना दिवाळी फराळाचे किट वितरित करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत जमिनीवर बसून भोजन करून त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी खरीप हंगामातील पीक उत्पादन, दुष्काळसदृश परिस्थिती आणि शेतकऱ्यांसमोरील विविध अडचणींवर चर्चा करण्यात आली.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करून शेतीचे नियोजन करावे, असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी केले. प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे, तहसीलदार अशोक भंडारे, मंडळ कृषी अधिकारी प्रशांत वाघमारे, कृषी सहाय्यक भाग्यश्री पतंगे, मंडळ अधिकारी लक्ष्मण ढाकणे, मंडळ अधिकारी हजारे, सहाय्यक कृषी अधिकारी आकाश माचवे तसेच जय किसान शेतकरी गटातील शेतकरी उपस्थित होते.
स्मार्ट प्रकल्पाची पाहणी
कानडी बदन येथील कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी युसुफ वडगाव येथील एस. एस. के. ॲग्रो प्रोड्युसर कंपनीला भेट देऊन स्मार्ट प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी शिवराज खरबड यांच्या शेतातील तूर व सोयाबीन या आंतरपीक पद्धतीची पाहणी केली.
दुष्काळात तूर बहरली
आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करून लागवड केलेल्या तूर पिकामध्ये ठिबक सिंचन, सेंद्रिय निविष्ठा आणि टोकण पद्धतीचा वापर याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घेतली.
भाजी-भाकरी खाऊन दिवाळी साजरी
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे आणि तहसीलदार अशोक भंडारे यांनी कानडी बदन येथे बचत गटाच्या महिलांसोबत शेतात जमिनीवर बसून भाजी-भाकरी आणि ठेचा खाऊन दिवाळी साजरी केली. यामुळे जिल्हाधिकारी शेतकऱ्यांप्रति संवेदनशील असल्याचे दिसून आले.

