गौतम बचुटे/केज:- केज बस स्थानकावर गर्दीचा गैरफायदा घेऊन वृद्ध महिलेच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्याने पळवल्याची घटना घडली आहे.
सोजरबाई विठ्ठल कांबळे (वय ६०, रा. जवळा, ता. कळंब, जि. धाराशिव) या वृद्ध महिला दि. ६ नोव्हेंबर रोजी दुपारी अंबाजोगाई येथून दवाखान्यातून उपचार घेऊन केज बस स्थानकावर आल्या होत्या. दुपारी ४:३० वा. सुमारास कळंबकडे जाणारी बस लागल्याने त्या बसमध्ये चढत असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला.
महिलेने आरडाओरड केल्यानंतर नागरिकांनी त्याचा पाठलाग केला, मात्र तो गर्दीचा फायदा घेत पसार झाला.
या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७०२/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०४(२) अन्वये गुन्हा दाखल असून सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण उंबरे तपास करीत आहेत.
