आधार माणुसकीच्या वतीने 1100 कुटुंबांना दिवाळी फराळ व माहेरची साडी वाटप

अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- कोणत्याही क्षेत्रात गेलात तरी तिथे सामाजिक दायित्व जोपासा, अशी अपेक्षा बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी व्यक्त केली.येथील संत गाडगेबाबा सेवाभावी संस्था, जोगाईवाडी, अंबाजोगाई संचलित आधार माणुसकीच्या उपक्रमातर्फे शनिवारी बीडसह इतर जिल्ह्यातील 1100 गरीब व गरजू कुटुंबांना दिवाळीचा फराळ व माहेरची साडी भेट देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर होते. मंचावर संभाजीनगर येथील राज्य प्रदूषण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकारी सिंधू कापरे, शोभा बाबू खडकभावी, प्रा. रोहिणी पाठक, लातूरच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. निहारिका नागरगोजे, आदर्श शिक्षिका शितल बोधले, अर्चना सुनील सोळंके, रजनी प्रवीण देशमुख, रुपाली काकडे, मोनिका मुंदडा, स्वाती चेतन मोदी, आधार परिवाराचे अध्यक्ष ॲड. संतोष पवार यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना विवेक जॉन्सन म्हणाले, शासनाच्या बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे. कोणताही व्यवसाय छोटा नसतो, तो जिद्द व चिकाटीने करा. जिथे अडचण येईल तिथे प्रशासन तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही आत्मनिर्भर व्हा. भविष्यात ऊसतोड कामगारांची पिढी शिक्षणाच्या माध्यमातून बंद झाली पाहिजे. ग्रामीण भागातील मुलांनी न्यूनगंड न बाळगता शिक्षणात पुढे यावे. राष्ट्रासाठी व मातृभूमीसाठी सामाजिक दायित्व जोपासता आले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी आधार माणुसकीच्या उपक्रमाचे कौतुकही केले.

आपल्या अध्यक्षीय समारोपात चंद्रशेखर बर्दापूरकर म्हणाले, माणूस जोडला की देश आपोआप जोडला जाईल. यासाठी समाजातील उपेक्षितांसाठी काम करता आले पाहिजे. ॲड. संतोष पवार गेल्या 10 वर्षांपासून चालवत असलेल्या या उपक्रमांच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी व समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचा आधार बनले आहेत.

यावेळी डॉ. निहारिका नागरगोजे, प्रा. रोहिणी पाठक यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आधार माणुसकीचे प्रमुख ॲड. संतोष पवार यांनी केले. या कार्यक्रमासाठी मराठवाडा मित्र मंडळ पुणे, विद्यार्थी विकास योजना ठाणे, चांगुलपणा चळवळ व लोकसहभाग, रामकृष्ण पवार, चंद्रशेखर शिंदे, रवींद्र लोमटे, अनंत निकते, बंडू जांभळे, धनराज पवार, संजय सुरवसे, राहुल शिंदे यांच्यासह आधार माणुसकीच्या सदस्यांनी सहकार्य केले.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...