२८ नोव्हेंबर २०२६ रोजी अप्पांची स्मृती समारोह आहे .त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा
एखादा माणूस गावासाठी जगतो, तेव्हा गाव त्याला देव मानतं. अंबाजोगाई तालुक्यातील आपेगावचे कै. शेषराव (अप्पा) शिंदे हे असंच नाव. वारकरी संप्रदायाच्या संस्कारात वाढलेला आणि शिक्षणाची तळमळ मनात घेऊन जगलेला एक कर्मवीर. त्यांनी स्वतःसाठी काहीच मागितलं नाही, गोरगरीब लेकरांसाठी आयुष्यभर शिक्षण देत राहिले.
अप्पांचा जन्म आपेगावात वारकरी घरात झाला. लहानपणापासूनच त्यांना शिक्षणाची प्रचंड ओढ होती. शिक्षणासाठी ते पुण्याला गेले आणि तिथं शिक्षण पूर्ण केलं. पुण्याहून परत आल्यावर त्यांच्या मनात एकच विचार होता – जे ज्ञान मला मिळालं, ते माझ्या गावातल्या लेकरांना का मिळू नये ?
विनावेतन शिकवायला सुरुवात, पण विरोध
या ध्यासातूनच त्यांनी गावातल्या प्राथमिक शाळेत जाऊन मुलांना शिकवायला सुरुवात केली. पगार नाही, मानधन नाही, फक्त शिकवण्याची तळमळ. गावातला हा तरुण आपल्यापेक्षाही चांगलं शिकवतो, हे काही शिक्षकांना रुचलं नाही. त्यांना राग आला. अप्पा शाळेत जाणं थांबवत नाहीत, हे पाहून शेवटी त्यांच्यावर पोलीस केसही करण्यात आली.
पण ज्ञानदानाची आग विझवणारी नव्हती. अप्पांचे मोठे बंधू अंबऋषी केरबा शिंदे यांनी अप्पांना तत्कालीन उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांच्याकडे नेलं आणि सांगितलं, “या पोराला शिक्षणाचा फार छंद आहे.” सोळंके साहेबांनीही आप्पांची तळमळ ओळखली. त्यांनी शाळा काढण्याचा सल्ला दिला आणि शाळा उभी करण्यासाठी मोठी मदतही केली.
२१ जून १९७१ : संस्थेची स्थापना
तिथून खरा प्रवास सुरू झाला. गावातल्या आणि परिसरातल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना आणि विशेषतः मुलींना शिक्षण मिळावं, या उद्देशाने अप्पांनी आपेगावातच २१ जून १९७१ साली श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था स्थापन केली. त्या माध्यमातून जयकिसान माध्यमिक विद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली.
शाळा सुरू झाली ती एका गोठ्यामध्ये ! खुर्ची नाही, टेबल नाही, पण शिकवण्याची जिद्द होती. संस्थाचालक असूनही अप्पा स्वतःच शिपायापासून शिक्षकापर्यंत सगळी कामं करायचे. झाडलोट, पाणी, शिकवणं, सगळं अप्पाच करायचे. हळूहळू शाळा नावारूपाला आली. शाळेची गुणवत्ता पाहून आजूबाजूच्या खेड्यांमधूनच नाही, तर परजिल्ह्यातूनही विद्यार्थी येऊ लागले.
विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह
विद्यार्थी वाढले, पण त्यांना राहायला जागा नव्हती. म्हणून अप्पांनी जय जवान वसतिगृह काढलं. विद्यार्थ्यांची संख्या मर्यादेपेक्षा जास्त झाली तरी अप्पा कुणाला परत पाठवत नव्हते. स्वतःच्या खर्चाने त्यांना प्रवेश द्यायचे, त्यांच्या राहण्या-खाण्याचा खर्च स्वतः सोसायचे. या लेकरांसाठी अप्पा शाळेतच झोपायचे, विद्यार्थ्यांसोबतच जेवायचे. सकाळी चार वाजता उठून स्वतः घंटी वाजवायचे, लेकरांसोबत रनिंग, व्यायाम करायचे. आप्पा शिक्षक नव्हते, बाप होते.
अप्पांनी तेव्हाच भविष्याचा वेध घेतला होता. केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसं नाही, मुलांना तांत्रिक शिक्षणही हवं, तरच ते स्वतःच्या पायावर उभं राहून रोजी-रोटी कमवतील, हे त्यांनी ओळखलं होतं. म्हणून त्यांनी शाळेत १९८३ साली तांत्रिक विद्यालय सुरू केलं. तिथून शिकलेल्या अनेक विद्यार्थ्यांना कंपन्यांमध्ये आणि महावितरणमध्ये नोकरीची संधी मिळाली.
मुलींना दिली शिक्षणाची संंधी
दहावीनंतर मुलींचं शिक्षण थांबतंय, हे पाहून अप्पांनी शाळेला लागूनच १९९० साली कला शाखेचे उच्च माध्यमिक सुरू केलं. त्यामुळे परिसरातल्या गोरगरीब मुली बारावीपर्यंत शिकू लागल्या. पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठीही अडचण येऊ लागल्यावर त्यांनी २००२ साली जयकिसान कला महाविद्यालय सुरू केलं. कला शाखेतील विद्यार्थी मागे पडत आहेत, हे लक्षात आल्यानंतर २००४ साली विज्ञान शाखा ही सुरू केली. शिक्षणाचा हा वसा आजही सुरू आहे. अप्पांचा हा ध्यास त्यांचे सुपुत्र प्रा. जयजित शिंदे आणि सूनबाई सौ. वर्षा जयजित शिंदे हे तेवढ्याच तळमळीने पुढे चालवत आहेत.
अप्पांच्या या अफाट सामाजिक कार्यामुळे परिसरात त्यांना लोक मनापासून ओळखत होते. त्यांच्या संस्थेला सामाजिक न्याय पुरस्कार मिळाला आहे, हाच त्यांच्या कार्याचा खरा गौरव आहे. गोठ्यातून सुरू झालेली शाळा आज हजारो लेकरांचं भविष्य घडवते आहे. हेच आप्पांचं खरं स्मारक आहे.
शिस्त आणि वेळेचे पक्के अप्पा
आप्पा हे शिस्तीचे अतिशय पक्के होते. त्यामुळेच प्रत्येक कार्यक्रमाला, प्रत्येक गोष्टीला ते सर्वांच्या अगोदर हजर असायचे. शाळा असो, सभा असो, गावातलं कोणतंही काम असो – आप्पा सगळ्यांच्या आधी पोहोचलेलेच असायचे. वेळेवर येणं, हे त्यांनी स्वतःवर घेतलेलं व्रतच होतं. यामुळेच शिक्षकांमध्ये आप्पांबद्दल एक वेगळी नैतिक भीती वाटायची. ही भीती दहशतीची नव्हती, तर आदराची होती. अप्पा काही बोलण्याआधीच शिक्षकांना कळायचं, आपण वेळेवर आलो पाहिजे, काम चोख केलं पाहिजे. कारण आप्पा स्वतःच सगळ्या गोष्टीत पुढे असायचे.
शिक्षकांबद्दल अप्पांच्या मनात प्रचंड आदर होता. शिक्षक हा गुरु आहे, तो चुकला तरी त्याला अपमानित करायचं नाही, तर प्रेमाने समजून सांगायचं, हा त्यांचा स्वभाव होता. कोणी चुकलं तर आप्पा त्याला बाजूला घेऊन, शांतपणे समजून सांगायचे. रागावणं, ओरडणं त्यांच्या स्वभावातच नव्हतं. त्यांच्या याच गुणामुळे शिक्षकही अप्पांवर जीव ओवाळून टाकायचे.
- शब्दांकन
- प्रा. पी. एस. तरकसे, आपेगाव
