गौतम बचुटे/केज: तालुक्यातील बोरगाव येथे वैद्यकीय शिक्षणाचा बनाव करून रुग्णांवर उपचार करणाऱ्या तोतया डॉक्टराला आरोग्य विभागाने जेरबंद केले आहे. विलास बन असे या भोंदू डॉक्टरचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोणतीही MBBS अथवा संबंधित पदवी नसताना केवळ औषधांची जुजबी माहिती असलेल्या विलास बन याने बोरगावात दवाखाना सुरू केला होता. भिंतीवर खोटी प्रमाणपत्रे लावून तो गावातील भोळ्या-भाबड्या रुग्णांची गेल्या कित्येक महिन्यांपासून दिशाभूल करत होता.याबाबतची गुप्त खबर आरोग्य विभागाला लागल्यानंतर गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मुंडे आणि छाया जाधव यांच्या पथकाने पोलिस कर्मचाऱ्यांसह सोमवारी दुपारी बोरगावात धाड टाकली.
कारवाई दरम्यान त्याच्याकडे वैद्यकीय व्यवसायासाठी लागणारे कोणतेही अधिकृत कागदपत्र, रजिस्ट्रेशन नंबर आढळून आला नाही. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि ग्रामपातळीवरील यंत्रणा असताना हा प्रकार कसा सुरू होता? असा सवाल यामुळे उपस्थित होत आहे.पथकाने त्याच्या दवाखान्यातील औषधे आणि इतर साहित्य ताब्यात घेतले असून, तालुका आरोग्य अधिकारी यांच्या तक्रारीवरून केज पोलिसात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे.जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम राबवण्याचे आदेश दिल्यानंतर ही पहिलीच मोठी कारवाई मानली जात आहे.
