युसुफ वडगाव / बीएन वृत्तसेवा : केज तालुक्यातील कळंबआंबा येथे शेंगदाणे वाटण्याच्या आवाजावरून झालेल्या वादातून चुलत भावानेच दुसऱ्या चुलत भावाला आणि त्याच्या आईला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी यु. वडगाव पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विठ्ठल राजाभाऊ इंगळे (वय २६ वर्ष, व्यवसाय शेती, रा. कळंबआंबा, ता. केज) यांच्या घरी दिनांक ०६ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजेच्या सुमारास स्वयंपाक सुरू होता. यावेळी घरात उखळात शेंगदाणे वाटत असताना झालेल्या आवाजावरून, फिर्यादी व आरोपी हे एकमेकांचे सखे चुलत भाऊ व शेजारी असणारे आरोपी नितीन भाऊराव इंगळे (रा. कळंबआंबा, ता. केज) यांनी किरकोळ कारणावरून फिर्यादी व फिर्यादीच्या आईला शिवीगाळ केली.
तसेच संतापलेल्या आरोपीने लोखंडी कोयत्याच्या मुठीने फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी केले, तर डाव्या हातावर दगडाने मारून मुका मार दिला आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या.या प्रकरणी विठ्ठल राजाभाऊ इंगळे यांच्या फिर्यादीवरून यु. वडगाव पोलीस ठाण्यात दिनांक ०६ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री २१:४७ वा. गु.र.नं. २९८/२०२६, कलम ११८(१), ३५२, ३५१(२) बीएनएस प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.




