परळी/प्रतिनिधी :- वंचित बहुजन आघाडीच्या बीड पूर्व जिल्हा संवाद दौऱ्याने परळीत राजकीय वातावरण तापवलं आहे. कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संवाद दौरा हा केवळ बैठक न राहता, आगामी संविधान सन्मान महासभेचा शंखनाद ठरला.
१६ नोव्हेंबर रोजी झालेल्या या दौऱ्याचा मुख्य उद्देश होता – संघटन बांधणी, पक्षविस्तार आणि २५ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या ऐतिहासिक संविधान सन्मान महासभेची जोरदार पूर्वतयारी. या दौऱ्याच्या अध्यक्षस्थानी बीड पूर्व जिल्हाध्यक्ष प्रकाश उजगरे होते. यावेळी जिल्हा महासचिव इंजि. विकास पवार, इंजि. प्रशांत उघडे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब किरवले, जिल्हा संघटक भारत तांगडे, प्रसन्नजीत रोडे, रानबा उजगरे यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष प्रकाश उजगरे यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट आवाहन केलं. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी, संविधान, समता आणि सामाजिक न्यायाचा विचार घराघरात पोहोचवण्यासाठी २५ नोव्हेंबरच्या महासभेला बीड पूर्व जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने मुंबई गाठायची आहे. प्रास्ताविक राजेश सरवदे यांनी केलं. सूत्रसंचालन प्रेम जगतकर यांनी केलं, तर आभार बौद्धाचार्य आनंद तुपसमुद्रे यांनी मानले.
बाळासाहेबांचे हात बळकट करा
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी, संविधान, समता आणि सामाजिक न्यायाचा विचार घराघरात पोहोचवण्यासाठी २५ नोव्हेंबरच्या महासभेला बीड पूर्व जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने मुंबई गाठायची आहे.
