गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील साळेगाव येथे बुधवारी सायंकाळी मद्यधुंद अवस्थेतील कारचालकाने केलेल्या भीषण अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली. भरधाव वेगात, हयगय व निष्काळजीपणे कार चालवून या चालकाने समोरून येणाऱ्या मोटरसायकलला जोराची धडक दिली. या धडकेत मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हा अपघात दि. १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास साळेगाव परिसरात घडला. धाराशिव जिल्ह्यातील अमित नरसिंगे (रा. जायफळ, ता. कळंब, जि. धाराशिव) हे आपल्या मोटरसायकल क्र. MH 12 / JX 3290 वरून जात असताना समोरून भरधाव वेगात आलेल्या कारने त्यांच्या मोटरसायकलला जोरात धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, मोटरसायकलस्वार रस्त्यावर फेकला गेला. त्याला डोके, हात व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेऊन जखमीला मदत केली.
पळून जाणाऱ्या चालकाला ग्रामस्थांनी पकडले
अपघातानंतर कारचालकाने थांबण्याऐवजी आपली कार घेऊन तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र साळेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते जोगदंड आणि लक्ष्मण लांडगे यांनी प्रसंगावधान राखत कारचा पाठलाग केला आणि काही अंतरावर कारसह चालकाला पकडले. यावेळी चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ग्रामस्थांच्या या धाडसामुळे आरोपी पळून जाण्यापासून वाचला, याबद्दल परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली
या घटनेची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी तातडीने आपल्या कर्मचाऱ्यांना अपघातस्थळी पाठविले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून कार व मोटरसायकल ताब्यात घेतली आहे. जखमी अमित नरसिंगे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी साळेगाव परिसरातील नागरिकांनी केली आहे.
साळेगाव मार्गावरून दररोज शेकडो वाहने ये-जा करतात. सायंकाळच्या वेळी या मार्गावर वाहनांची वर्दळ वाढते. अशा वेळी मद्यधुंद व भरधाव वाहनचालकांमुळे निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात येत असल्याने पोलिसांनी या मार्गावर नियमित नाकाबंदी व तपासणी करावी, अशी मागणीही नागरिकांमधून होत आहे.
