१ कोटी ३ लाख रुपये व्याजासह भरण्याचे आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश
गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील नांदूरघाटच्या सरपंच श्रीमती सुनिता युवराज जाधव यांनी ग्रामपंचायतीचे कामकाज करताना हलगर्जीपणा, कर्तव्य पार पाडताना कसूर केल्याचे व सार्वजनिक निधीचा अपहार केल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे गैरअर्जदार सरपंच यांना ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावरुन सांप्रत कालावधीसाठी अपात्र घोषित करण्यात आले असल्याचा आदेश विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिला आहे.
नांदूरघाट ता. केज, ग्रामपंचायतीने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत नांदूरघाट येथे २६ रस्ते कामा पैकी १३ रस्ते कामांच्या मोजमापे नोंदविलेल्या पुस्तिका आढळुन आल्या नाहीत. एकुण २६ रस्त्यां पैकी ८ रस्त्यावर कसलेच काम न होता खर्च नोंदविलेला आहे. या रस्त्यावरील उचललेली अकुशल व कुशल मजुरीची रक्कम रुपये ५९ लक्ष ४६ हजार ४१३ रु. वसुलपात्र ठरली. १२ रस्ते कामावर वितरीत झालेली एकुण अकुशल व कुशल रक्कम व त्यावर झालेला प्रत्यक्ष खर्च यामध्ये निघालेली तफावत रुपये ४४ लक्ष ४३ हजार ६७ रु. ही वसुलपात्र आढळून आले. या वरुन सरपंच सुनीता जाधव यांनी या कामांमध्ये रुपये १ कोटी ३ लाख ८९ हजार ४८०/- अपहार केल्याचे निदर्शनास आले.
असा झाला सरपंचाचा अपहार सिद्ध :-
सरपंच श्रीमती सुनिता युवराज जाधव, यांनी ग्रामपंचायतीचे कामकाज करताना हलगर्जीपणा, कर्तव्य पार पाडताना कसूर केल्याचे व सार्वजनिक निधीचा अपहार केल्याचे स्पष्ट होते. तसेच अपहारीत रक्कम रुपये ३३,१५,१४७/- बँकेत भरणा केला. त्या वरुन त्यांना अपहार मान्य असल्याने त्यांनी अपहार केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सरपंच यांना ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावरुन सांप्रत कालावधीसाठी अपात्र घोषित करण्यात आले.
ग्रामपंचायत अधिकारी आणि शाखा अभियंत्यावर निलंबनाची कारवाई :-
नांदूरघाट ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी आणि शाखा अभियंता यांचे विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ पोटकलम (४) मधील तरतुदी नुसार प्रस्तावित निलंबनाची कार्यवाही तात्काळ पुर्ण करण्यात येणार आहे.
ग्रामरोजगार सेवक, तांत्रिक अधिकारी आणि सीडीईओ यांच्यावरही होणार कारवाई
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रकरणात जबाबदार ग्रामरोजगार सेवक, तांत्रिक अधिकारी व सीडीइओ यांचे विरुद्ध प्रस्तावित केलेली कारवाई करण्याचे आदेश मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
अपहार केलेली रक्कम व्याजासह भरा
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दोषी असणाऱ्या पदाधिकारी व कर्मचारी यांचेवर जबाबदारी निश्चित करुन अपहारीत रक्कम निश्चित करून अपहारीत रक्कम रुपये १ कोटी ३ लक्ष ८९ हजार ४८० रु. सर्व संबंधितांकडून व्याजासह वसुल करुन शासनखाती भरणा करण्याचे आणि दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे देखील आदेशित दिले आहेत.हेच हवं होतं ना?
