अंबाजोगाई/बीएन वृत्तसेवा:
अंबाजोगाई येथील नवकेशर डान्स अँड ड्रामा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अंदमान निकोबार येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत रूपाली लोंढे हिने सुवर्णपदक, तर वंशिका मुंडे व आद्या मोमले रेड्डी यांनी रौप्यपदक पटकावले आहे. त्यामुळे अंबाजोगाईचे नाव पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल झाले आहे.
अखिल भारतीय सांस्कृतिक संघ, पुणे आणि युनेस्को यांच्या संयुक्त विद्यमाने 12 ते 16 नोव्हेंबर या कालावधीत अंदमान निकोबार येथे 16 व्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेचे – इंटर कल्चर ऑलम्पियाड ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स 2026 चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जगभरातील 480 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी केवळ 24 स्पर्धकांना सुवर्णपदक मिळाले, त्यात रूपाली लोंढे हिचा समावेश आहे.
यापूर्वी पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय नृत्य स्पर्धेतही रूपालीने प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यामुळे तिला ग्लोबल एक्सलेन्स अवॉर्डनेही सन्मानित करण्यात आले. अंबाजोगाईच्या नवकेशर अकॅडमीच्या एकूण 6 विद्यार्थ्यांनी या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यापैकी 4 जणांनी पारितोषिके पटकावली.
या स्पर्धेसाठी राष्ट्रीय स्पर्धेत विजयी झालेले विद्यार्थीच पात्र ठरतात. यावर्षी 21 ते 24 मे 2026 दरम्यान पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतून या विद्यार्थ्यांची निवड झाली होती. यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
नवकेशर अकॅडमीचे प्रमुख भिमाशंकर शिंदे यांनी सांगितले की, अकॅडमी गेली 19 वर्षे अविरत सुरू आहे. संस्थेच्या अध्यक्षा आरती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 23 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी येथे नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे. येथे बॉलिवूड, लावणी, वेस्टर्न, सेमी क्लासिकल, हिप हॉप, कंटेम्पररी व महाराष्ट्रीयन लोकनृत्य शिकवले जाते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नृत्य क्षेत्रात करिअर करता यावे, हा अकॅडमी सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश आहे.
