अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे विभागीय आयुक्तांना निवेदन
अंबाजोगाई/ प्रतिनिधी – अंबाजोगाई तालुक्यातील शेतकरी कार्ड योजनेत मोठी दप्तर दिरंगाई होत असून यामध्ये गैरव्यवहार झाला आहे का, याची चौकशी करावी, अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे बीड जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण यांनी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे केली आहे.
याबाबतचे निवेदन गुरुवारी अपर जिल्हाधिकारी अंबाजोगाई यांच्यामार्फत देण्यात आले.समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण, महिला जिल्हाध्यक्ष ज्योती साखरे, जिल्हा कार्याध्यक्ष जहांगीर पठाण, तालुकाध्यक्ष विलास धुमाळ, दयानंद गुजर, ओंकार चव्हाण यांच्यासह शेतकरी कार्ड योजनेतील शेतकरी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, पात्र असूनही अनेक शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवले जात आहे. त्रुटी काय आहे हे न सांगता त्यांना वारंवार हेलपाटे मारायला लावले जात आहेत. हा शेतकऱ्यांवर अन्याय असून यात जाणीवपूर्वक दिरंगाई किंवा गैरव्यवहार असल्याचा संशय समितीने व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
समितीच्या मागण्या
अंबाजोगाई तालुक्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या शेतकरी कार्डवरील पीएफएमएसमध्ये अडकलेले देयक देऊन ऑनलाईन लाभ सुरळीत सुरू करावा. या प्रकरणात दिरंगाई किंवा गैरव्यवहार झाला आहे का, याची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. तसेच केलेल्या कारवाईबाबत लेखी माहिती द्यावी. या मागण्यांवर कारवाई न झाल्यास दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय अंबाजोगाई येथे अनोखे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात शांतता राखून तहसील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फुलांचा गुच्छ देऊन सत्कार करण्यात येईल. कोणताही गोंधळ किंवा शासकीय कामात अडथळा आणला जाणार नाही, असे निवेदनात स्पष्ट केले आहे.
शेतकऱ्यांना न्याय मिळावा
शेतकरी कार्ड योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना वेळेत मिळावा, यासाठी समितीने हा लढा उभारला आहे. दिरंगाई थांबली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा राणा चव्हाण यांनी दिला आहे.
