अंबाजोगाई : दिवाळीनिमित्त माहेरी आलेल्या महिलेची बसस्थानकात हरवलेली दागिने आणि मौल्यवान वस्तूंसह पर्स अंबाजोगाई शहर पोलिसांनी अवघ्या काही तासात शोधून परत केली. या पर्समध्ये 2 लाख 86 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल होता. पोलिसांच्या या तत्परतेमुळे महिलेने आणि नातेवाईकांनी आभार मानले.
पूजा गजानन भांगरे, रा. सोलंकरवाडी, ता. माढा, जि. सोलापूर या दिवाळीनिमित्त अंबाजोगाई येथे त्यांचे वडील गोवर्धन दादासाहेब भुसारे यांच्याकडे आल्या होत्या. परत गावी जाताना अंबाजोगाई बसस्थानकावर बसमध्ये चढण्याच्या गडबडीत त्यांची दागिने असलेली पर्स बसस्थानकातच विसरून राहिली.
पर्स हरवल्याचे लक्षात येताच त्यांनी पतीसह अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी तात्काळ बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये 80 ते 85 वर्षे वयोगटातील एका व्यक्तीने पर्स उचलल्याचे दिसले. चेहरा स्पष्ट दिसत नसल्याने पोलिसांनी पर्समधील मोबाईलचे लोकेशन तपासले. ते बर्दापूर परिसरात असल्याचे निष्पन्न झाले.
पर्समध्ये सापडलेला मुद्देमाल :
त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक माहितीच्या आधारे त्या वयोवृद्ध व्यक्तीची ओळख पटवून पोलिसांनी बर्दापूर परिसरात जाऊन त्यांच्याकडून पर्स हस्तगत केली.
- मिनी गंठण (1 तोळा) – 1,45,000 रु.
- मिनी मंगळसूत्र (4 ग्रॅम) – 56,000 रु.
- बदाम (अर्धा ग्रॅम) – 7,000 रु.
- कानातील दागिने (4 ग्रॅम) – 56,000 रु.
- मोबाईल – 20,000 रु.
- स्मार्ट वॉच – 2,000 रु.
- साधे घड्याळ – 500 रु.
एकूण – 2,86,500 रु.
अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन येथे सदर पर्स व संपूर्ण मुद्देमाल पूजा भांगरे यांना परत करण्यात आला.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार बदाम आरसूळ व पोलीस नाईक तेजस वावळे यांनी पार पाडली.
पोलिसांचे आवाहन
प्रवासादरम्यान बसस्थानक, रेल्वे स्टेशन, बाजारपेठेत आपले दागिने, मोबाईल व मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. काही हरवल्यास विलंब न करता तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.
