गौतम बचुटे/केज :– केज तालुक्यातील जानेगाव येथे पारवे आणि दोनगहू या दोन कुटुंबांमध्ये प्रेम विवाह झाला होता. त्या रागातून तरुणीच्या माहेरच्यांनी तिच्या पतीसह सासू-सासरे आणि दिराला दगडाने मारहाण केली.
बीड जिल्ह्यातील जानेगाव तालुका केज येथील तरुण आशिष मन्मथ पारवे हा पुणे जिल्ह्यातील वासुली ता. खेड येथे एका खाजगी कंपनीत नोकरी करीत असताना त्याचे चाकण येथील एका तरुणीशी प्रेमसंबंध जुळले. त्यातून ते दोघे आळंदी येथे विवाहबद्ध झाले. त्यानंतर हे नवविवाहित जोडपे केज तालुक्यातील जानेगाव येथे राहण्यासाठी आले होते. गावी आल्याची माहिती तरुणीच्या आई-वडिलांना मिळताच दि. १९ नोव्हेंबर रोजी त्या तरुणीची आई अनुसया सुरेश दोनगहू ही जानेगाव येथे आली. ती घरी येताच जावयाच्या घरी तिला चहापाणी करून पाहुणचार केला. त्यानंतर तिने आपले पती सुरेश दोनगहू यांना फोन करून जानेगाव येथे बोलावून घेतले. सुरेश दोनगहू आणि त्यांच्यासोबत इतर अनोळखी इसम जानेगाव येथे आले. त्यांनी आशिष पारवे याची नवविवाहित पत्नी हिला जबरदस्तीने चाकण येथे माहेरी घेऊन जाण्यासाठी ओढू लागले.
त्यावेळी आशिष आणि त्याच्या आई-वडिलांनी तुम्ही आमच्या सुनेला घेऊन जाऊ नका, असा विरोध केला. त्यावर आशिषचे सासरे, सासू आणि इतर अनोळखी इसमांनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच आशिषच्या भावाच्या डोक्यात दगड मारून त्याला जखमी केले.
गुन्हा दाखल
या प्रकरणी आशिष पारवे याच्या तक्रारीवरून त्याचे सासरे सुरेश दोनगहू, सासू अनुसया दोनगहू आणि दोघे अनोळखी इसम यांच्या विरुद्ध युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गु. र. न. ३०५/२०२६ भा. न्या. सं. ११५(२), ११८(१), ३५१(२), ३५२, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल केशव बिक्कड हे तपास करीत आहेत.
प्रेम विवाहातून वाद विकोपाला
आळंदी येथे प्रेम विवाह करून जानेगावला आलेल्या जोडप्याला माहेरच्यांनी विरोध केल्याने हा वाद हाणामारीपर्यंत गेला. पाहुणचार करूनही माहेरच्यांनी मुलीला जबरदस्तीने नेण्याचा प्रयत्न केल्याने दोन्ही कुटुंबात तणाव निर्माण झाला आहे.
