अंबाजोगाई / बीएन वृत्तसेवा: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (SCERT) यांच्या वतीने अंबाजोगाई येथील खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात आयोजित वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाची रविवारी (दि. २२) उत्साहात सांगता झाली. १३ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या या प्रशिक्षणात एकूण 163 शिक्षकांनी सहभाग नोंदविला.
शिक्षकांच्या व्यावसायिक प्रगतीच्या दृष्टीने वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. प्रशिक्षणादरम्यान नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020), डिजिटल शिक्षण, विद्यार्थी केंद्रित अध्यापन, आधुनिक शैक्षणिक संकल्पना आणि अध्यापन पद्धतीतील नावीन्य यावर मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणामुळे शिक्षकांना बदलत्या शैक्षणिक प्रवाहानुसार आपले अध्यापन कौशल्य अद्ययावत करण्याची संधी मिळाली. या प्रशिक्षणाच्या यशस्वितेसाठी ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी अशोक कोपले यांनी केंद्र समन्वयक म्हणून, केंद्रप्रमुख बर्दापूर येथील सुरेश सलगर यांनी प्रशिक्षण समन्वयक म्हणून, तर डायटच्या जेष्ठ अधिव्याख्याता सुलक्षणा पवार यांनी संपर्क अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली.
प्रशिक्षणात शिस्तीला विशेष महत्त्व देण्यात आले होते. प्रत्येक तासाला उपस्थिती घेऊन ती तात्काळ ऑनलाइन अपलोड केली जात होती. त्यामुळे प्रशिक्षणार्थींची १०० टक्के उपस्थिती सुनिश्चित करण्यात आली. प्रशिक्षणाची सांगता समाधानकारक वातावरणात झाली.
सुलभकांचे मोलाचे मार्गदर्शन
प्रशिक्षणादरम्यान सुलभक म्हणून सुनील वाघमोर, रामलिंग बेले, प्रा. रमेश भोसले, श्रीनिवास मोरे, अनंत सूर्यवंशी, वैजनाथ शेंगुळे, अनंत जोशी, दिलीप नरवडे, शेख आबेद,रिजवान शेख, प्रशांत देशपांडे इत्यादींनी यांनी विविध विषयांवर प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. आधुनिक शैक्षणिक संकल्पना, अध्यापन पद्धती आणि विषयांची प्रभावी मांडणी यांद्वारे त्यांनी प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
शिस्तबद्ध नियोजनातून प्रशिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी
प्रत्येक तासाला ऑनलाइन हजेरी घेण्याच्या पद्धतीमुळे प्रशिक्षणात नियमितता आणि शिस्त राखली गेली. समन्वयक, संपर्क अधिकारी आणि सुलभकांच्या नियोजनबद्ध योगदानामुळे 163 शिक्षकांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाले.
शिक्षकांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रशिक्षण महत्त्वाचे
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणामुळे शिक्षकांना नवीन शैक्षणिक धोरण, डिजिटल शिक्षण आणि विद्यार्थी केंद्रित अध्यापनाची माहिती मिळाली. या ज्ञानाचा प्रत्यक्ष वर्गाध्यापनात उपयोग झाल्यास विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेत सकारात्मक बदल घडू शकतो. – अशोक कोपले (प्रशिक्षण केंद्र समन्वयक तथा जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकार, अंबाजोगाई)

