अंबाजोगाई / बीएन वृत्तसेवा : जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावी प्रवेश परीक्षेच्या केंद्र निश्चितीवरून यंदा मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यार्थी सध्या ज्या जिल्ह्यात शिक्षण घेत आहेत, त्याऐवजी आधार कार्डवर जो जिल्हा आहे, त्याच जिल्ह्यात परीक्षा केंद्र निश्चित होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यासह राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना मूळ जिल्ह्यात जाऊन परीक्षा देण्याची वेळ आली आहे.
नेक पालक नोकरीनिमित्त दुसऱ्या जिल्ह्यात वास्तव्यास आहेत. त्यांची मुलं अनेक महिन्यांपासून, काही तर वर्षांपासून अंबाजोगाई, बीड परिसरातील शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. मात्र, आधार कार्डवरील जुना पत्ता बदलला नसल्याने त्यांची परीक्षा केंद्रे आधारवरील जिल्ह्यात आली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना सध्या शिकत असलेल्या जिल्ह्यात परीक्षा देता येत नाहीये.
उदाहरण म्हणून अंबाजोगाई तालुक्यातील एका विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्र आधारवरील जिल्ह्यानुसार हिंगोली येथे आले आहे. त्याला जाण्या-येण्याचा मिळून जवळपास ३०० किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे. अशाच प्रकारे अनेक या लहान विद्यार्थ्यांना १०० ते २०० किलोमीटर दूर जाऊन परीक्षा द्यावी लागणार असल्याची माहिती आहे. यंदाच्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत आधारशी संबंधित माहितीचा वापर झाल्याने परीक्षा केंद्र निश्चितीमध्ये आधारवरील पत्त्याला प्राधान्य मिळाले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, आधारवरील पत्त्याच्याच जिल्ह्यात परीक्षा देणे बंधनकारक असल्याचा अधिकृत नियम किंवा परिपत्रक असल्याची खात्री झालेली नाही. याबाबत नवोदय प्रशासनाने स्पष्टीकरण देण्याची गरज आहे.
२८ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता परीक्षा होणार असल्याने पालकांची धावपळ सुरू झाली आहे. दूरच्या केंद्रामुळे प्रवासखर्च, राहण्याची व्यवस्था आणि लहान विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण वाढणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सध्याच्या शैक्षणिक जिल्ह्यातच परीक्षा देण्याची पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी पालक करीत आहेत.
परीक्षा केंद्र निश्चितीचा प्रश्न :
आधारवरील जुना पत्ता आणि विद्यार्थ्याचे सध्याचे शैक्षणिक ठिकाण वेगवेगळे असल्यास शाळेचा दाखला व बोनाफाईड प्रमाणपत्र ग्राह्य धरून केंद्र निश्चितीची सुविधा द्यावी. अन्यथा तांत्रिक प्रक्रियेचा फटका विद्यार्थ्यांना बसू शकतो.
विद्यार्थ्यांच्या हितासाठी तातडीचा निर्णय आवश्यक :
परीक्षा जवळ आल्याने पालकांसमोर प्रवास आणि आर्थिक खर्चाचे आव्हान उभे राहिले आहे. नवोदय प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून पर्यायी परीक्षा केंद्र उपलब्ध करावे, जेणेकरून कोणत्याही पात्र विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.
पालकांची प्रतिक्रिया :
आम्ही जाण्या-येण्याचा खर्च करू शकत नाही. त्यामुळे मुलाला हिंगोलीला परीक्षेसाठी पाठवणं आम्हाला शक्य नाही. त्यामुळे तो ही परीक्षा देऊ शकणार नाही, परीक्षा बुडणार आहे. एवढ्या लांब प्रवासासाठी पैसे नाहीत, राहण्याची सोय नाही. मुलगा महिन्यांपासून इथेच शिकतोय, मग परीक्षा इथेच का घेता येत नाही, असा सवाल संबंधित विद्यार्थ्याच्या पालकांनी उपस्थित केला आहे.
प्रशासनाची बाजू :
या संदर्भात बीड जिल्ह्यातील गड येथील नवोदयच्या प्रचारास विचारण्यासाठी संपर्क केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. प्रशासनाकडून प्रतिक्रिया आल्यास ती प्रसिद्ध करण्यात येईल.
