दोन गावांची तहान भागवण्यासाठी प्रशासन सरसावले

अंबाजोगाई / बीएन वृत्तसेवा: धावडी आणि केंद्रेवाडी या दोन्ही गावांची पिण्याच्या पाण्यासाठी सुरू असलेली वणवण आता थांबणार आहे. भावठाण तलावातून या दोन्ही गावांना पाणीपुरवठा करण्याचा मोठा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. गावात पाण्याचा थेंबही शिल्लक नसल्याने गावकरी हैराण झाले होते. अखेर प्रशासनाला पुढे यावे लागले आहे.

बुधवारी तहसीलदार विलास तरंगे आणि गटविकास अधिकारी श्री. बळवंत यांनी भावठाण व मोरफळी साठवण तलावावर प्रत्यक्ष भेट दिली. त्यांनी तलावातील पाणीसाठ्याची पाहणी केली. तलावात अजूनही पाणी उपलब्ध असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे याच तलावातून दोन्ही गावांना पाणी देण्याचे निश्चित करण्यात आले. या निर्णयामुळे दोन्ही गावांना मोठा दिलासा मिळाला आहे. भावठाण तलाव हाच आता दोन्ही गावांसाठी आधार ठरणार आहे.पाणी वाटपात अडथळा आल्यास तात्काळ तक्रार निवारण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरम्यान लांडगदरा पुन्हा जिवंत करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. यावेळी अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

शंभर वर्षाचा तलाव आटल्याने पाणी संकट

धावडी येथील शंभर वर्षांचा ऐतिहासिक लांडग दरा तलाव यंदा पूर्णपणे कोरडा ठाक पडला आहे. पिढ्यानपिढ्या गावाची तहान भागवणारा हा तलाव यंदा तळाला गेला आहे. त्यात पाण्याचा एकही थेंब उरला नाही. या तलावाच्या पायथ्याशी असलेल्या विहिरीही आता कोरड्या पडल्या आहेत. या विहिरींमधूनच धावडी आणि केंद्रेवाडी या दोन्ही गावांना पाणीपुरवठा होत होता. विहिरी आटल्याने दोन्ही गावांसमोर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. पाण्यासाठी महिला आणि वृद्धांना दूरवर भटकंती करावी लागत आहे. ही परिस्थिती पाहून प्रशासनाने तात्काळ पावले उचलली आहेत.

विहीरीत टाकले जाणार पाणी

नव्या व्यवस्थेनुसार भावठाण तलावातून पाणी आणून ते तलावाखालील पाणीपुरवठ्याच्या विहिरीत टाकण्यात येणार आहे. त्या विहिरीतून गावाला पाणीपुरवठा केला जाणार आहे. पाणी वाटपावरून वाद होऊ नये म्हणून आलटून पालटून पद्धत ठरवली आहे. एक दिवस धावडीला आणि दुसऱ्या दिवशी केंद्रेवाडीला पाणी दिले जाणार आहे. त्यामुळे दोन्ही गावांना समान पाणी मिळेल आणि कोणावरही अन्याय होणार नाही. पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून प्रशासक, ग्राम महसूल अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांना तात्काळ अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.

Pratik Tarkase is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...