अंबाजोगाई/बीएन वृत्तसेवा: – अंदमान निकोबार येथील आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या नवकेशर अकॅडमीच्या विजेत्यांचा सन्मान आणि विजयोत्सव सोहळा नुकताच अंबाजोगाईत आयोजित करण्यात आला. यावेळी बोलताना अखिल भारतीय नाट्य परिषद, बीडच्या अध्यक्षा डॉ. दीपाताई क्षीरसागर यांनी सांगितले की, अंबाजोगाईसारख्या छोट्या शहरातून पुढे येत या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवून देशात बीड जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे.

शहरालगत असलेल्या खंदारे मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. दीपाताई क्षीरसागर होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी आमदार संजय दौंड, महाराष्ट्र डेंटल कौन्सिलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, नगरसेवक बबनराव लोमटे, नगरसेवक श्रीकांत धायगुडे, डॉ. राहुल धाकडे, डॉ. राजेश इंगोले, रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाईचे अध्यक्ष भीमाशंकर शिंदे, सचिव सुनील व्यवहारे, नवकेशर सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा प्रा. सौ. आरती शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात नटराज पूजनाने झाली. प्रास्ताविक भीमाशंकर शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अनंत कांबळे यांनी केले, तर आभार प्रा. आरती भीमाशंकर शिंदे यांनी मानले.

यावेळी नवकेशर डान्स अँड ड्रामा अकॅडमीच्या सुवर्णपदक प्राप्त रूपाली लोंढे, रौप्यपदक प्राप्त आद्या मोमले आणि रौप्यपदक प्राप्त वंशिका मुंडे, तसेच राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या कु. आराध्या वरपे व भाग्यश्री गिरी यांचा मान्यवरांच्या हस्ते गोल्ड मेडल, सिल्व्हर मेडल, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

छोट्या शहरातून आंतरराष्ट्रीय यश

अंबाजोगाईसारख्या छोट्या शहरातून मुली अंदमान निकोबारपर्यंत जाऊन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदकं जिंकतात, ही साधी गोष्ट नाही. मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरात सुविधा असतात, पण इथे मेहनत आणि गुरुंच्या मार्गदर्शनावरच मुली पुढे गेल्या. नवकेशरने ही अडचण पार केली आहे. हेच या यशाचं खरं मोठेपण आहे. बीड जिल्ह्याला आता फक्त राजकारणासाठी नाही, तर कलेसाठीही ओळखलं जाईल.

मान्यवरांचा पाठिंबा आणि पुढची जबाबदारी

कार्यक्रमात संजय दौंड यांनी नवकेशर ही अंबाजोगाईच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठी भरीव योगदान देणारी संस्था आहे, असे सांगितले. पृथ्वीराज साठे यांनी भीमाशंकर शिंदे हे त्यांच्या नृत्य अकादमीतून सांस्कृतिक वारसा जोपासत अंबाजोगाईचा नावलौकिक वाढवत आहेत, असे सांगितले. अनिकेत लोहिया यांनी नवकेशरचे रोपटे मानवलोकच्या मनस्विनी प्रकल्पाच्या सानिध्यात वाढताना पाहिल्याचे सांगितले. तर डॉ. राजेश इंगोले यांनी “मेहनत इतक्या शांततेत करा की, तुमच्या यशाचा जल्लोष सर्वांना ऐकू गेला पाहिजे” असे म्हणत विजेत्यांचे अभिनंदन केले. डॉ. क्षीरसागर यांनी भीमाशंकर शिंदे यांनी आणखी उत्साहाने बाल नाट्य परिषदेसाठीही कार्य करावे, असे सांगितले आणि बीड जिल्ह्यातील कलाकारांच्या पाठीशी मी नेहमीच उभी असेन, असे अभिवचन दिले. आता फक्त सत्कारावर न थांबता या मुलींना पुढच्या मोठ्या स्पर्धांसाठी शासनाकडून मदत आणि व्यासपीठ मिळाले पाहिजे, हीच खरी गरज आहे.

हा लेख ही वाचा…

Pratik Tarkase is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...