अंबाजोगाई: येथील रोशन कॉलनी भागात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ६ वर्षांच्या फरहान आस मोहम्मद कुरेशी या चिमुरड्याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. लातूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमधून प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.
काही दिवसांपूर्वी घराच्या परिसरात असताना मोकाट कुत्र्यांच्या एका टोळक्याने फरहानवर अचानक हिंसक हल्ला चढवला होता. कुत्र्यांनी त्याला चावा घेऊन गंभीर जखमी केले होते. घटनेनंतर कुटुंबीयांनी त्याला तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल केले; परंतु जखमा खोल असल्याने प्रकृती बिघडत गेली. त्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी तातडीने लातूरला हलवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
शहरातील गल्लोगल्ली मोकाट श्वानांचा उपद्रव धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. विशेषतः लहान मुलांच्या व वृद्धांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे निष्पाप बालकाला जीव गमवावा लागल्याचा आरोप करत, प्रशासनाने आतातरी कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी आक्रमक मागणी रहिवाशांनी केली आहे.
अंबाजोगाईत भटक्या श्वानांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ६ वर्षांच्या बालकाचा मृत्यू
