अंबाजोगाई/ प्रतिनिधी:
अंबाजोगाई शहरातील योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित श्रीमती गोदावरीबाई कुंकूलोळ योगेश्वरी कन्या शाळेसमोरील मुख्य रस्ता पूर्णपणे खराब झाल्यामुळे विद्यार्थिनी, शिक्षक आणि पालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
शाळेचे मुख्य प्रवेशद्वार मांडवा रोडवरील डॉ. धर्मपात्रे यांच्या दवाखान्यासमोर असून, येथील सुमारे २०० मीटर रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. या रस्त्यावरून रोज शाळेच्या १७०० विद्यार्थिनी, ७० कर्मचारी आणि अनेक पालक ये-जा करतात. तसेच, शाळेच्या आवारात विज्ञान केंद्र असल्यामुळे तालुक्यातील इतर शाळांमधील विद्यार्थी व शिक्षक देखील या मार्गावरून नियमित भेट देण्यासाठी येतात. रस्ता खड्ड्यात गेल्यामुळे आणि वर्दळीचा मार्ग असल्यामुळे सर्वांनाच नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
घाण पाण्याची दुर्गंधी
रस्त्यावर मोठे खड्डे, साचलेलं घाण पाणी आणि कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला असून विद्यार्थिनींच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अशा घाणीतूनच विद्यार्थिनींना व शाळेतील कर्मचाऱ्यांना शाळेकडे जावे लागत आहे.
त्वरित दुरुस्तीची मागणी
विद्यार्थिनी आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन, नगर परिषदेने या मार्गाची तातडीने दुरस्ती करावी, अशी मागणी शाळेच्या मुख्याध्यापिकांनी पत्राद्वारे नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.
