गौतम बचुटे/केज: दैव बलवत्तर असल्यास कोणत्याही संकटातून जीव वाचू शकतो, याचा प्रत्यय केज तालुक्यातील साळेगाव येथे आला. 60 फूट खोल विहिरीत पडूनही मारुती मुंडे सुखरूप बाहेर आले.
दि. 20 नोव्हेंबर रोजी बोबडेवाडी येथील मारुती मुंडे हे शेळ्या चारण्यासाठी साळेगाव शिवारात आले होते. राजाभाऊ वरपे यांच्या विहिरीशेजारील झाडांचा पाला शेळ्यांना टाकला. सायंकाळी 4:45 वाजता शेळ्या हाकण्यासाठी जाताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते थेट 60 फूट खोल विहिरीत पडले. विहिरीत कमरेएवढे पाणी होते. विहिरीला पायऱ्या नव्हत्या, त्यामुळे ते बाहेर येऊ शकले नाहीत. पत्रकार गौतम बचुटे यांनी नगराध्यक्षा सीताताई बनसोड, उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे, तहसीलदार अशोक भंडारे आणि पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांना माहिती देताच त्यांनी रेस्क्यू टीमशी संपर्क साधला. मात्र त्यांच्याकडे एवढ्या उंचीची शिडी नव्हती आणि आपत्कालीन टीम छत्रपती संभाजीनगर येथून येण्यास 4 तास लागणार होते. तोपर्यंत गावकऱ्यांनीच हिम्मत दाखवून मारुती यांना सुखरूप बाहेर काढले.
मोबाईलही बंद पडला
विहिरीत पडल्यानंतर त्यांनी मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण मोबाईलमध्ये पाणी गेल्याने मोबाईल बंद पडला. थंडी आणि मुक्या मारामुळे ते गलितगात्र झाले होते. अंधार पडू लागल्याने त्यांची भीती आणखीनच वाढली होती.
हेल्मेटमुळे वाचला जीव
बाज सोडताना डोक्यात दगड पडू नये म्हणून राजाभाऊ वरपे यांनी दोराला बांधून हेल्मेट आत सोडले. ते हेल्मेट घालून मारुती विहिरीच्या भिंतीला धरून बसले होते.बाहेर आल्यानंतर मारुती यांच्या डोक्याला किरकोळ मार लागला असून हात-पाय आणि कमरेला मुका मार लागला आहे. मात्र सुखरूप बाहेर आल्याचा आनंद इतका होता की, बाहेर येताच ते वेदना विसरून पळायला लागले.
अशोक तोंडे ठरले देवदूत
सायंकाळी 5:30 वाजता अशोक तोंडे विहिरीशेजारून जात असताना त्यांना हाका मारण्याचा आवाज आला. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता मारुती विहिरीत असल्याचे दिसले. त्यांनी लगेच गावकऱ्यांना कल्पना दिली.
तरुणांनी दाखविली हिम्मत
मारुती यांना बाहेर काढण्यासाठी जय जोगदंड, अशोक तोंडे, अक्षय वरपे, राजाभाऊ वरपे, गौतम बचुटे, सौरभ वरपे, शोएब सय्यद, बाळू तोंडे, बालाजी तोंडे, शिवाजी तोंडे, संतोष तोंडे, ओमकार तोंडे, धनराज तोंडे, महादेव वरपे, रामा वरपे, लिंबराज बचुटे यांनी विहिरीत बाज सोडली. चारही कोपऱ्यांना दोर बांधून हळूहळू त्यांना बाजेवर बसवून बाहेर काढले.
