डी सदानंद / अंबाजोगाई : परवा बीडच्या पुढे राधिका ट्रॅव्हल्स आणि उसाच्या ट्रॉलीचा झालेला भीषण अपघात अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा होता. या अपघातातून सुखरूप बचावलेल्या अंबाजोगाईच्या मयुरी जोशी हिने मृत्यूला अगदी जवळून पाहिले.

अंबाजोगाईहून नाशिकला जाण्यासाठी मयुरी ट्रॅव्हल्समध्ये बसली होती. आईने जाऊ नकोस, असे सांगितले होते. मात्र तरीही प्रवासाला निघाली. तब्येतही फारशी चांगली नव्हती. मेडिकलची विद्यार्थिनी असल्यामुळे कॉलेजला जाणे आवश्यक होते, असे मयुरी हिने सांगितले. प्रवासात मयुरी गाढ झोपेत होती. अचानक मध्यरात्री धडाम असा प्रचंड आवाज झाला. काही कळण्याच्या आत गाडीचा भीषण अपघात झाला होता. मयुरी गाडीच्या एका कोपऱ्यात होती. सर्वत्र काचा, पत्र्याचे तुकडे आणि अपघाताचा ढिगारा दिसत होता. लोकांचा आरडाओरडा सुरू होता.
मयुरी हिने हळूच पडदा उघडून पाहिले, तर गाडी उसाच्या ट्रॉलीला धडकली होती. चार जण गाडीत अडकले होते. त्यांची अवस्था अत्यंत भयानक होती. ते रक्ताने माखलेले होते. काही क्षण नेमके काय घडले आहे, हेच समजत नव्हते. सगळीकडे अंधार आणि भीतीचे वातावरण होते. मयुरी हिच्या चपलाही रक्ताने लाल झाल्या होत्या. मयुरी मदतीसाठी जोरजोरात ओरडू लागली. तेवढ्यात कोणीतरी मदतीचा हात दिला. मागील एक्झिटमधून मयुरीला बाहेर काढण्यात आले. बाहेरही सर्वत्र अंधार होता. काय करावे, कुठे जावे, काहीच सुचत नव्हते.

सुदैवाने बीडहून मयुरी हिच्या कॉलेजचे दोन मित्रही नाशिकला जात होते. त्यांनी मोठा आधार दिला आणि मदत केली. दुसऱ्या दिवशी सकाळी दुसऱ्या ट्रॅव्हल्सने मयुरी कॉलेजला पोहोचली. या अपघातात किमान चार जणांचा मृत्यू झाला असावा, असे मयुरीला वाटते. तो प्रसंग आठवला तरी मन सुन्न होते, असेही ती म्हणाली.

आईची हुरहूर…

प्रत्येक आईला आपल्या लेकराची चाहूल आधीच लागते. मयुरीच्या आईला पण लागली होती. म्हणूनच तिने जाऊ नकोस म्हटले होते. आज मयुरीला वाटते, आईचे ऐकले असते तर हा प्रसंगच आला नसता. पण नियतीच्या पुढे कोणाचे चालते? आईच्या त्या एका वाक्याने आज पूर्ण कुटुंबाला विचार करायला लावले आहे.

संकटात मैत्री…

अपघातानंतरचे काही मिनिटे सगळ्यात अवघड होते. अंधार, भीती आणि एकटेपणा. त्या वेळी कोणी जवळचं असणं हेच सगळ्यात मोठं बळ असतं. मयुरीच्या बाबतीत तेच झालं. अनोळखी रस्त्यावर कॉलेजचे मित्र भेटले आणि तिला एकटं वाटलं नाही. या घटनेने मैत्रीची किंमत पुन्हा एकदा कळली.

सूचना : मयुरी हिच्या विनंतीनुसार तिचा फोटो प्रसिद्ध करत नाही. तिच्या भावना समजून घ्याव्यात, ही विनंती

Pratik Tarkase is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...