धारूर, दि. १८ (बीड न्यूज एक्सप्रेस) :- धारूर तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढत चालली आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सात गावांसाठी टँकर मंजूर केले आहेत.
मंजूर झालेल्या गावांमध्ये असोला, उंबरवाडी, गोपालपूर, आवरगाव, अंजनगाव, खोडाड आणि मैदवाडी या गावांचा समावेश आहे. यापैकी पाच गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. उर्वरित दोन गावांमध्ये लवकरच टँकर सुरू होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दुसरीकडे, तालुक्यातील ४१ गावांमधून विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव पंचायत समितीकडे आले आहेत. मात्र, अद्याप त्यापैकी एकाही प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे अनेक गावांना टँकरवरच अवलंबून राहावे लागत आहे.पंचायत समिती आणि पाणीपुरवठा विभाग यांच्यात समन्वय नसल्यामुळे हे प्रस्ताव रखडल्याची चर्चा आहे. तहसीलदारांनी विहिरींची चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश दिले होते, मात्र अद्याप प्रत्यक्ष अधिग्रहणाचे आदेश निघालेले नाहीत.
दरम्यान, धारूर तालुक्यातील काही गावांमध्ये ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. पाण्याची टंचाई अधिक गंभीर होण्याआधी प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
