अंबाजोगाई/ प्रतिनिधी :
अंबाजोगाईच्या श्री योगेश्वरी नूतन विद्यालयातील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक डॉ.कमलाकर कोंडिबा राऊत यांना राष्ट्रीय स्तरावरील ‘भारत काव्यरत्न राष्ट्रीय सम्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
डोंबिवलीच्या इन्कलाब पब्लिकेशनने हा पुरस्कार दिला आहे. काव्यग्रंथ, सन्मानपत्र, पदक आणि मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. इन्कलाब पब्लिकेशनचे प्रकाशक रमाकांत यादव यांनी देशभरातून देशभक्तीपर हिंदी कविता मागवल्या होत्या. त्यातून निवडक कवींच्या रचना ‘भारत का अभिमान: तिरंगा’ या देशभक्तीपर काव्यसंग्रहात छापण्यात आल्या. यात डॉ.राऊत यांच्या ‘स्वाधीनता दी हैं तुम्हें’, ‘भारतीय हैं संस्कृति’, ‘सुखी विश्व चाहती हैं’ या तीन रचनांचा समावेश आहे.
संपादक डॉ.पंकज पालीवाल यांनी राऊत यांच्याबद्दल लिहिलंय, सरलता, सामाजिक जुळवून घेणं आणि कामाबद्दलची सक्रियता हेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रमुख गुण आहेत. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर, सचिव कमलाकर चौसाळकर, मुख्याध्यापिका ए.आर.पाठक, शिक्षक, विद्यार्थी आणि चाहत्यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे.
डॉ.राऊत यांचा प्रवास थक्क करणारा
कमलाकर राऊत हे सुरुवातीला आय.टी.आय. फिटरच्या आधारे धूत कॉम्पॅक व बजाज कंपनीत कामगार म्हणून काम केलं. नंतर १९९७ साली योगेश्वरी नूतन विद्यालयात शिक्षक म्हणून रुजू झाले. नोकरी करता करता त्यांनी साहित्यभूषण, बी.ए., एम.ए., बी.एड., एम.एड., नेट, पीएच.डी. सह अनेक पदव्या घेतल्या. आजपर्यंत त्यांची ३ पुस्तके, संपादित २ पुस्तके, ४८ शोधनिबंध आणि ५०० पेक्षा जास्त लेख, कविता, कथा प्रकाशित झाल्या आहेत. २० वेळा रक्तदान करून त्यांनी अनेकांचे प्राण वाचवले आहेत.
या पुरस्काराबद्दल बोलताना डॉ.राऊत म्हणाले, “अध्यापन आणि लेखन हेच माझे श्वास आहेत. ज्या शाळेत शिकलो, त्याच शाळेत शिकवतोय, याचा मला सार्थ अभिमान आहे.”
