अंबाजोगाई/प्रतिनिधी:–
चोरी झाल्यानंतर मुद्देमाल परत मिळेल का, हीच भीती फिर्यादीच्या मनात असते. पण अंबाजोगाई शहर पोलिसांनी चोरीच्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांतील मुद्देमाल हस्तगत करून तो आज संबंधित फिर्यादींना परत केला आहे. त्यामुळे फिर्यादींना मोठा दिलासा मिळाला आहे.
सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या हस्ते हा मुद्देमाल परत करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्यासह पोलीस अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते.चोरीचा मुद्देमाल लवकरात लवकर फिर्यादीला परत मिळावा, यासाठी पोलिसांनी तपासापासून ते न्यायालयीन प्रक्रियेपर्यंत पाठपुरावा केला. त्यामुळेच आज हा मुद्देमाल फिर्यादींच्या हाती सोपवता आला, असं पोलिसांनी सांगितलं.
घरफोडीतील सोने-चांदी परत
पहिला गुन्हा बँक कॉलनीतील गुलाबचंद हनुमानदास सारडा (वय ५६) यांच्या घरफोडीचा आहे. त्यांच्या घरातून सोने-चांदीची चोरी झाली होती. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत केला. न्यायालयीन प्रक्रियेनंतर पोलिसांनी हस्तगत केलेले ४९.८ तोळे सोने आणि १६०० ग्रॅम चांदी आज सारडा यांना परत केली. एवढा मोठा मुद्देमाल परत मिळाल्याने सारडा कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार मानले.
लॅबमधील चोरीतील ३३ हजार रुपये परत
दुसरा गुन्हा निवृत्ती पार्क, राजीव नगर येथील प्रमोद भारत चिवडे (वय ३०) यांच्या लॅबमधील चोरीचा आहे. त्यांच्या लॅबमधून ३३ हजार रुपये चोरीला गेले होते. पोलिसांनी या गुन्ह्यातील ३३,००० रुपये रोख रक्कम हस्तगत करून ती आज चिवडे यांना परत केली.
पोलिसांची भूमिका
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक आनंद शिंदे, महिला उपनिरीक्षक सुचिता केदार, पोलीस नाईक तेजस वावळे, हवालदार पांडुरंग काळे आणि अंमलदार हनुमंत चादर यांनी ही कारवाई केली.
