अंबाजोगाई/बीएन वृत्तसेवा: अंबाजोगाई शहरापासून जवळच असलेल्या जोगाईवाडी तलावावर हिवाळा सुरू होताच सायबेरिया, युरोप आणि उत्तर भारतातून स्थलांतर करून आलेले पाहुणे पक्षी उतरले आहेत. एकाच वेळी 4 दुर्मिळ आणि विशेष पक्षी इथे दिसले आहेत.
परदेशातील सायबेरिया आणि युरोपमध्ये हिवाळ्यात प्रचंड थंडी पडते. तिथले तलाव गोठून जातात, त्यामुळे पक्ष्यांना खाद्य मिळत नाही आणि जगणं अवघड होतं. म्हणून हे पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून भारतासारख्या उबदार देशात येतात. इथे त्यांना पाणी, मासे, किडे आणि सुरक्षित जागा मिळते. मार्च महिना आला की थंडी कमी झाली की हेच पक्षी पुन्हा आपल्या देशात परत जातात. यालाच पक्ष्यांचे स्थलांतर म्हणतात. हे विदशी पक्षी अंबाजोगाई पासूनच जवळच असलेल्या जोगाईवाडी तलावावर दाखल झाले आहेत. हे पक्षी पाहण्यासाठी व त्यांच्या हालचाली टिपण्यासाठी पक्षी निरीक्षक या तलावावर येत आहेत.
तलावावर आढळून आलेले पक्षी
ब्लॅक हेडेड बंटिंग – (पिवळी चिमणी)
वीजेच्या तारेवर बसलेली दिसते
डोकं काळं, अंग पिवळं
स्थलांतर करून आलेला पाहुणा पक्षी
शेतातल्या बिया खात फिरतो
ग्रेट थिक नी (दुर्मिळ पक्षी)
तलावाच्या काठावरच्या वाळूत उभा दिसताे
मोठे पिवळे डोळे, लांब पाय ही ओळख
दिवसा शांत बसतो, रात्री सक्रिय असतो
क्वचितच दिसणारा दुर्मिळ पक्षी
कॉमन पोचार्ड (लाल डोक्याचं बदक)
तलावाच्या पाण्यात पोहताना दिसतात
डोकं लाल-तांबडं, अंग राखाडी
सायबेरियातून हजारो किमी प्रवास करून आले
पाण्यात बुडी मारून मासे, किडे खातात
ओपन बिल स्टॉर्क (उघड्या चोचीचा करकोचा)
झाडावर शांत बसलेला दिसताे
पांढरं अंग, काळे पंख
चोच मधोमध थोडी उघडी असते, म्हणून ओपन बिल
गोगलगाय खाण्यात पटाईत
पाणी पातळी कमी
दिवसेंदिवस तलावाच्या पाण्याची पातळी कमी होत चालली आहे. त्यामुळे हे पाहुणे पक्षी इथे किती दिवस राहतील, याची खात्री नाही. पाणी आटलं की हे पक्षी दुसऱ्या तलावाकडे निघून जातील. त्यामुळे या पक्ष्यांना फिडिंगची गरज नाही, तर पाणी टिकवून ठेवण्याची गरज आहे.
“विदेशी पक्ष्यांसोबतच स्थानिक पक्ष्यांनाही पाण्याअभावी त्रासदायक स्थितीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच्या घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, खिडकीमध्ये, झाडांजवळ पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी. नारळाच्या करवंटीत, गाडग्याच्या किंवा मडक्याच्या तुकड्यात पिण्याचे पाणी ठेवावे. यामुळे पक्ष्यांची पाण्यासाठी होणारी हाल थांबेल. दरवर्षी अनेक पक्षीप्रेमी मार्च ते मे या काळात पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करत असतात, परंतु भीषण दुष्काळामुळे यावर्षी हे काम आपल्याला नोव्हेंबरपासूनच करावे लागणार आहे.”
Pratik Tarkase is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...
More by Beed News Express