आकाश वाघमारे / चंदन सावरगाव: केज तालुक्यातील जवळबन येथील तलावात आता अल्पसाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. नोव्हेंबर महिना संपता संपताच तलावातील पाणी मोठ्या प्रमाणात आटले असून तलावाचा मोठा भाग कोरडा पडला आहे. तलावाच्या मधोमधच फक्त थोडे पाणी दिसत आहे, बाकी सगळीकडे चिखल आणि कोरडी जमीन आहे. तलावाजवळची पाणी उपसा विहीरही जवळपास कोरडी पडली आहे.
जवळबन तलावातून चंदन सावरगाव,जवळबन, भाटुंबा, लाडेगाव, ढाकेफळ,बोरीसावरगाव आणि लाडेवाडगाव गावांना पाणीपुरवठा होतो. त्यामुळे तलाव आटल्याचा फटका केवळ एका गावाला नाही, तर या सर्व गावांना बसणार आहे. आधी या तलावात फेब्रुवारी-मार्चपर्यंत पाणी टिकून राहायचे. उन्हाळ्यातही जनावरांना आणि शेतीला पाणी मिळायचे. पण गेल्या दोन-तीन वर्षांपासून तलाव लवकर आटू लागला आहे. यंदा तर नोव्हेंबरमध्येच तलावाने तळ गाठला आहे. त्यामुळे पुढचे चार-पाच महिने आम्ही पाणी कसे भागवायचे, हा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला आहे, अशी चिंता या सर्व गावातील ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. त्यामुळे प्रशासनाने आतापासूनच पाणी वापराचे नियोजन करावे, पाण्याचा अपव्यय थांबवावा, टँकर आणि पर्यायी पाणी पुरवठ्याची तयारी ठेवावी, अशी मागणी चंदन सावरगाव,जवळबन , भाटुंबा, लाडेगाव, ढाकेफळ,बोरीसावरगाव आणि लाडेवाडगाव येथील शेतकरी आणि ग्रामस्थांकडून केली जात आहे.
नोव्हेंबरमध्येच पाणी पातळी कमी
जवळबन तलाव हा केवळ पाणी साठवण्याचे ठिकाण नाही, तर तो संपूर्ण परिसराच्या भूजल पातळीचा आधार आहे. तलावात पाणी असेल तरच आजूबाजूच्या विहिरी, बोअरवेल यांना पाणी राहते. आता नोव्हेंबरमध्येच तलाव आटला म्हणजे डिसेंबर, जानेवारीत विहिरींची पातळी झपाट्याने खाली जाणार आहे. चंदन सावरगाव,जवळबन , भाटुंबा, लाडेगाव, ढाकेफळ,बोरीसावरगाव आणि लाडेवाडगाव या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उन्हाळा सुरू होण्याआधीच गंभीर होणार आहे. यंदा पाऊस कमी झाला, बाष्पीभवन जास्त झाले आणि तलावात गाळ साचल्याने पाणी साठवण्याची क्षमता कमी झाली, याचा हा एकत्रित परिणाम आहे. याकडे आतापासून लक्ष दिले नाही तर एप्रिल-मे मध्ये तिन्ही गावांना टँकरशिवाय पर्याय राहणार नाही.
रब्बी हंगाम आणि जनावरांच्या चाऱ्यावर थेट परिणाम
जवळबन तलावाच्या पाण्यावर तिन्ही गावातील शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम अवलंबून आहे. हरभरा, गहू, ज्वारी, भाजीपाला ही पिके तलावाच्या ओलाव्यावर आणि पाण्यावर जगतात. तलाव आटल्याने ही पिके हातची जाण्याची भीती आहे. त्यातच जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही आणि चारा पिकवण्यासाठीही पाणी नाही, अशी दुहेरी अडचण झाली आहे. पाणी नाही म्हणून शेतकरी पिके सोडून देतील, मजुरांना काम मिळणार नाही, जनावरे विकावी लागतील, अशी साखळी यातून तयार होईल. म्हणून हा प्रश्न केवळ तलावाच्या पाण्याचा नाही, तर तिन्ही गावांच्या अर्थकारणाचा आहे.
ही बातमी ही वाचा…..
