गौतम बचुटे, केज :-मालक आणि त्याच्या भावाच्या छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या १८ वर्षीय सिद्धनाक रवि सिरसट याच्या मृत्यू प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी संतप्त नातेवाईक आणि कार्यकर्त्यांनी शवविच्छेदनानंतर प्रेत पोलीस ठाण्यात आणले. त्यामुळे केजमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. नंतर पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी तीन पथके रवाना केल्याची माहिती दिल्यानंतर प्रेत अंतिम संस्कारासाठी टाकळी येथे नेण्यात आले.

दि. २६ नोव्हेंबर रोजी सिद्धनाक सिरसट (रा. टाकळी, ता. केज) याने केज येथील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे असलेल्या अखिल खतीब यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तो अखिल खतीब व खलील खतीब यांच्याकडे जनावरे सांभाळण्याचे काम करीत होता. कुटुंबाचा विरोध असतानाही त्याला पैशाचे आमिष दाखवून बळजबरीने कामाला लावले, कामाचे पैसे दिले नाहीत, म्हशी धुणे, शेण काढणे, गोठा साफ करणे अशी कामे करून घेतली, असा आरोप कुटुंबियांनी केला आहे. वडील रवी सिरसट यांच्या तक्रारीवरून अखिल खलील खतीब आणि मुस्तकीन खलील खतीब यांच्याविरुद्ध गु. र. नं. ७३२/२०२६, भा. न्या. सं. १०८ आणि अॅट्रॉसिटी कलम ३ (२), ३ (v) नुसार गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम हे करीत आहेत. मृत्यूनंतर सुमारे २८ तासांनी टाकळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

१८ वर्षाच्या पोराचा छळ आणि वेठबिगारी

सिद्धनाक फक्त १८ वर्षांचा होता. शिक्षणाच्या वयात त्याच्या हातात पुस्तकाऐवजी गोठ्यातील झाडू आला. कुटुंबाचा विरोध असतानाही त्याला कामाला लावणे, पैसे न देणे, बळजबरीने कामे करून घेणे, हा केवळ आत्महत्येचा प्रकार नाही. हा अल्पवयीन मुलाला वेठीला धरण्याचा आणि जातीच्या आधारावर होणाऱ्या छळाचा प्रकार आहे. म्हणूनच पोलिसांनी यात अॅट्रॉसिटीचे कलम लावले आहे. बीड जिल्ह्यात गरीब, दलित कुटुंबातील मुलं आजही अशाच कामात अडकतात, हे या प्रकरणातून पुन्हा समोर आले आहे.

पोलिसांची सुरुवातीची भूमिका आणि २८ तासांचा विलंब

सुरुवातीला पोलिस केवळ आकस्मिक मृत्यूची नोंद करणार होते, असं कुटुंबियांचं म्हणणं आहे. कुटुंबियांनी आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यावरच गुन्हा दाखल झाला. त्यामुळे मृतदेह २८ तास अडकून राहिला. गरीब माणसाला न्याय मिळवण्यासाठी प्रेत पोलीस ठाण्यात आणावं लागतं, हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे. आता खरी कसोटी पोलिसांची आहे. आरोपींना लवकर अटक झाली नाही, तर केजमध्ये पुन्हा तणाव वाढू शकतो. आरोपींना अटक, फास्ट ट्रॅकवर खटला आणि पीडित कुटुंबाला शासकीय मदत, हे तीनच मुद्दे आता महत्त्वाचे ठरणार आहेत.

तीन पोलिस पथके रवाना

आरोपींच्या शोधासाठी तीन पोलिस पथके तैनात रवाना झाले असल्याची माहिती दिली. त्यानंतर प्रेत अंतिम संस्कारासाठी टाकळी येथे घेऊन गेले.

ही बातमी ही वाचा…

Pratik Tarkase is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...