अंबाजोगाई (बीएन प्रतिनिधी):
अंबाजोगाई तालुक्यातील चनई ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक लक्ष्मण देशमाने व उपसरपंचांच्या संगनमताने सुरू असलेल्या कथित अनधिकृत आर्थिक लूट आणि भ्रष्टाचाराविरोधात उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर ८ ऑक्टोबरपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू झाले आहे. या प्रकरणी प्रशासनाची उदासीनता आणि दोषी कर्मचाऱ्यांची पाठराखण स्पष्ट दिसत असल्याचा संताप आंदोलकांनी व्यक्त केला आहे.
निवेदनानुसार, चनई ग्रामपंचायतीत PTR वर नाव नोंद करण्यासाठी रेडी रेकनर मूल्यांकनाच्या १% ऐवजी प्रति प्लॉट ५,००० ते १०,००० रुपयांची अनाधिकृत वसुली केली जात आहे. पैसे न दिल्यास नाव नोंद न करण्याची धमकी देत हुकूमशाही चालवली जात आहे. गावात नियमित पाणी व विद्युत पुरवठा नसतानाही सक्तीने करवसुली करून गरिबांची पिळवणूक केली जात आहे. याविरोधात विचारणा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना व लोकप्रतिनिधींना कलम ३५३ अंतर्गत शासकीय कामात अडथळा किंवा खंडणीचे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप आहे.
शासकीय निधीचा अपहार:
- मागासवर्गीय व अपंग निधी: शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतीच्या १५% मागासवर्गीय निधी आणि ५% अपंग कल्याण निधी गेल्या ८-१० वर्षांत खर्च न करता संगनमताने लाटण्यात आला.
- योजनांमधील गैरव्यवहार: २०१० पासून आंतरजातीय विवाह जोडप्यांचे अर्थसहाय्य तसेच रमाई व पंतप्रधान आवास योजनेत प्रत्यक्ष घरकुल बांधकाम न करताच पैसे वर्ग करून फसवणूक करण्यात आली आहे.
प्रमुख मागण्या:
१. ग्रामसेवक लक्ष्मण देशमाने यांच्यावर खात्यांतर्गत चौकशी करून त्वरित निलंबनाची कारवाई करावी.
२. सखोल चौकशीसाठी तात्काळ चौकशी समिती नियुक्त करावी.
३. ग्रामसेवक व उपसरपंचावर फसवणूक, BNS कलम १९८, १९९, २०१, ३१८(४) आणि लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे नोंदवावेत. न्याय मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला असून या आंदोलनाने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

