धाडीत व्याजापोटी कर्जदाराकडून घेतलेले ५५ धनादेश आणि ४ खरेदीखत व इतर कागदपत्रे घेतली ताब्यात
गौतम बचुटे/केज: केज तालुक्यातील जीवाचीवाडी येथील एका सावकाराविरुद्ध पोलिस आणि सहाय्यक उपनिबंधक कार्यालयाने धाड टाकून केलेल्या कारवाईत वेगवेगळ्या कर्जदाराकडून त्या सावकाराने व्याजापोटी घेतलेले ५५ धनादेश, ४ खरेदीखत आणि इतर कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. यामुळे तालुक्यातील अवैधरित्या सावकारकी करून कर्जदाराला वेठीस धरणाऱ्या खाजगी सावकारांचे धाबे दणाणले आहेत.
केज तालुक्यातील जीवाचीवाडी येथील राजाभाऊ सुखदेव केदार हे सावकारकी करीत असून ते कर्जदाराकडून व्याजापोटी अवाच्या सव्वा दराने व्याज घेऊन पिळवणूक करून सावकारकी करून जमिनी लिहून घेत असल्याची तक्रार एकाने दिली होती. त्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने दि. १९ नोव्हेंबर रोजी नानासाहेब चव्हाण, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, लातूर व सतिष तोटावार, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, बीड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या पथकाने चौकशीच्या अनुषंगाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ अंतर्गत राजाभाऊ सुखदेव केदार (रा. जीवाचीवाडी, ता. केज, जि. बीड) यांच्या राहत्या घरी सहकार विभाग व केज पोलिस यांनी संयुक्त कारवाई केली.
त्याच्या घरी पथकाने धाड टाकून घेतली असता त्यात कथित अवैध सावकारी व्यवहाराबाबत संशयित असलेले व्याज उल्लेख हिशेब व एकूण ५५ कोरे धनादेश आणि ४ खरेदीखत आढळून आले. ते सर्व धनादेश, खरेदीखत आणि इतर कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.सदर प्रकरणी उक्त नमूद सावकारी कायद्याअंतर्गत पुढील चौकशी करण्यात येत आहे.
नागरिकांना आवाहन
अवैध सावकारी व्यवहार करणाऱ्यावर प्रभावी नियंत्रण व कार्यवाही करण्याकरिता सहकार विभागाचे जिल्हा निबंधक (सावकारी) तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बीड व प्रत्येक तालुक्यातील सावकारांचे सहाय्यक निबंधक तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाकडे गोपनीय स्वरुपात तक्रार दाखल करून अशा व्यक्तींची माहिती द्यावी. तक्रारदाराचे नाव धाडीच्या कार्यवाहीपर्यंत गोपनीय ठेवून आवश्यक कायदेशीर कार्यवाही तात्काळ करण्यात येईल. असे आवाहन जिल्हा उपनिबंधक यांनी केले आहे.
