अंबाजोगाई (प्रतिनिधी):-
आशिया खंडातील सर्वात मोठे शासकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयातील एक्स-रे मशीन गेल्या महिनाभरापासून बंद असल्याने रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे. एक्स-रे कक्षाला कुलूप लागले असून, दररोज उपचारासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांना ताटकळत परत जावे लागत आहे.

स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात अंबाजोगाईसह केज, परळी, धारूर, वडवणी तालुक्यातून शेकडो रुग्ण दररोज उपचारासाठी येतात. एवढ्या मोठ्या रुग्णालयात महिनाभर एक्स-रे मशीन बंद राहणे, ही अतिशय गंभीर बाब आहे. ग्रामीण भागातील गरीब रुग्णांना खासगीतील हा ३०० रुपयांचा खर्चही परवडत नाही. त्यामुळे अनेक रुग्ण एक्स-रे न काढताच केवळ गोळ्या-औषध घेऊन घरी जात आहेत. त्यामुळे त्यांच्या आजाराचे योग्य निदानच होत नाही. एक्स-रे मशीन तातडीने दुरुस्त करून सुरू करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

माहिती देण्यास टाळाटाळ

मशीनमध्ये नेमका काय बिघाड झाला आहे, दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठवला आहे का, याबाबत रुग्णालय प्रशासनाकडून कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नाही. महिनाभरापासून मशीन बंद असूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेतलेली नाही, असा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.

मशीन धुळखात

एक्स-रे रूममध्ये मशीन धूळ खात पडून आहे. बाहेर मात्र रुग्णांची लांबच लांब रांग लागली आहे. हात-पाय फ्रॅक्चर झालेले, अपघातातील रुग्ण, छातीचे आजार असलेले रुग्ण एक्स-रेसाठी तासनतास वाट पाहत आहेत. शेवटी नाईलाजाने त्यांना खासगी सेंटरमध्ये जाऊन ३०० रुपये मोजून एक्स-रे काढावा लागत आहे.

चार तास दवाखान्यातील एक्स-रे डिपारमेंटच्या समोर आम्ही बसलो होतो. परंतु कोणीही तिथे सांगत नव्हतं की एक्स-रे चालू आहे किंवा नाही. प्रशासनाने रुग्णांचे होणारे हाल थांबवावे. – रमेश सरवदे (पेशंट)

Pratik Tarkase is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...