गौतम बचुटे/केज: अवैध गुटखा विक्रीची माहिती पोलिसांना दिल्याच्या संशयावरून गुटखा माफियांनी भरदिवसा घरात घुसून पती-पत्नीला लोखंडी पाईपने मारहाण करून दहशत निर्माण केल्याची धक्कादायक घटना केजमध्ये घडली आहे.

दि. १८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास केज शहरातील प्रशांत नगर येथे ही घटना घडली. सागर बाजीराव चाळक, आकाश बाजीराव चाळक, कृष्णा बबन चाळक आणि एक अनोळखी इसम (सर्व रा. प्रशांत नगर, केज) यांनी सुरेश कन्नमवार यांच्या घरात घुसून मारहाण केली.

सागर चाळक हा सुरेश कन्नमवार यांना म्हणाला की, “हरामखोरा, तू पोलिसांना मी गुटखा विकतो याची माहिती देऊन माझ्यावर कारवाई करायला का लावलीस? मारा रे याला आणि याची मस्ती जिरवा.” असे म्हणून त्याने हातातील लोखंडी पाईपने सुरेश कन्नमवार यांना मारहाण केली. तर इतरांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करून त्यांची पत्नी दैवशाला कन्नमवार व सुरेश कन्नमवार या दोघा पती-पत्नीला लाथा-बुक्क्यांनी व दगडाने मारहाण केली.

मारहाणी प्रकरणी गुन्हा

या प्रकरणी दैवशाला कन्नमवार यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात सागर बाजीराव चाळक, आकाश बाजीराव चाळक, कृष्णा बबन चाळक आणि एक अनोळखी इसम या चौघांविरुद्ध गु. र. नं. ७२१/२०२६ भा. न्या. सं. ११५(२), ११८(१), ३३३, ३५२, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल बजरंग मुंडे तपास करीत आहेत.

गुटखा जप्त,गुन्हा दाखल

केज पोलिसांच्या डीबी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण उंबरे, पोलीस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इनामदार, पोलीस हेडकॉन्स्टेबल संगीता हनवते, पोलीस कॉन्स्टेबल नितीन वारे यांनी दि. १८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास प्रशांत नगर, केज येथील सागर बाजीराव चाळक याच्या घराच्या मागील बाजूस मोकळ्या जागेत एका लोखंडी पत्र्याच्या शेडमध्ये राज्यात बंदी असलेल्या गुटख्याचा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्रीसाठी साठा केल्याचे आढळून आले होते.त्यावरून पोलिसांनी धाड टाकून केलेल्या कारवाईत ११ हजार ८०५ रु. चा मुद्देमाल जप्त केला होता. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दादाराव देवगुडे यांच्या फिर्यादीवरून सागर बाजीराव चाळक याच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ७२०/२०२६ भा. न्या. सं. १२३, २७४, २७५, २२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pratik Tarkase is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...