खूप दिवसांनी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहिला. निमित्त होते ‘रामायण’!रामायण म्हटलं की बालपणापासून ऐकलेल्या, पाहिलेल्या आणि मनावर कोरलेल्या अनेक आठवणी जाग्या होतात. यापूर्वी टीव्हीवर रामानंद सागर यांची रामायण मालिका पाहिली. जितेंद्र यांची भूमिका असलेले रामायण पाहिले. कोकणातील दशावतारी नाटकातून, रामकथा, कीर्तनातून ऐकलेल्या रामकथा अशा अनेक माध्यमांतून रामायण आपल्या मनात रुजले आहे. आदर्श पुरुष राम, त्याग, मर्यादा, नात्यांची बांधिलकी, सत्य आणि धर्म यांचे महत्त्व आपण याच कथेतून शिकलो.मात्र आताचा रामायण चित्रपट पाहताना अनेक गोष्टी वेगळ्या जाणवल्या. काहींनी आश्चर्य वाटले, तर काहींनी हसूही आले.

एक तोंडाचा रावण आणि बाहुबलीची आठवण

आपण ऐकलेला दहा तोंडांचा रावण या चित्रपटात मात्र एका तोंडाचा दिसतो. सडपातळ, नृत्य करणारा, तर कधी ‘संयम’ असा डायलॉग मारणारा रावण! एका फटक्यात हजारो सैनिकांचा फडशा पाडून त्यांच्या ढिगाऱ्यावर बसणारा रावण पाहताना तर बाहुबली चित्रपटाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.सहा महिने झोपणारा कुंभकर्ण, त्याचे भव्य रूप आणि युद्धाचे प्रसंगही वेगळ्याच पद्धतीने सादर केले आहेत. तंत्रज्ञान, भव्य सेट, अॅक्शन आणि दृश्यांचा थाट पाहता हा रामायणापेक्षा बाहुबलीच्या भव्यतेची आठवण करून देणारा अनुभव वाटतो.

सोन्याची घरे आणि निवडणुकीचा जाहीरनामा

आणखी एक गंमतीशीर प्रसंग म्हणजे रावणाच्या राज्यातील घराघरांचे वर्णन! सगळ्यांची घरे सोन्याची आणि राज्यात जे काही खाल्ले जाईल ते प्रत्येकाला मिळेल, असा काहीसा डायलॉग ऐकायला मिळतो. मनात सहज विचार आला, जर रावणाच्या राज्यात निवडणुका झाल्या असत्या, तर या एका घोषणेवरच सगळी मते रावणाला पडली असती की काय! आजच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यांची आठवण करून देणारा हा संवाद वाटला.

सीतामाईचे दर्शन

विशेष म्हणजे सीतामाईचे दर्शनही एका वेगळ्याच रूपात झाले. तलवार हातात घेऊन दोन हात करणारी सीता पाहताना आपण लहानपणापासून मनात जपलेल्या सीतेच्या प्रतिमेपेक्षा काहीतरी वेगळेच पाहत आहोत, असे वाटले.खरे तर प्रत्येक काळात रामायण सांगण्याची, दाखवण्याची आणि समजून घेण्याची पद्धत बदलत राहते. तंत्रज्ञान बदलते, कलाकार बदलतात, सादरीकरण बदलते; पण रामायणाचा मूळ गाभा बदलू नये, असे मात्र मनापासून वाटते.रामायण ही केवळ राम-रावणाच्या युद्धाची कथा नाही. ती आदर्श जीवनाची, कर्तव्याची, त्यागाची, संयमाची आणि मर्यादेची शिकवण देणारी जीवनगाथा आहे.चित्रपट पाहून बाहेर पडलो, पण डोक्यात मात्र रामानंद सागर यांचे रामायण, बालपणी ऐकलेल्या रामकथा, कीर्तनातील प्रसंग आणि आताच्या आधुनिक रामायणाची तुलना सुरूच होती!

शेवटी एकच म्हणावेसे वाटते – रामायण कितीही वेळा पाहिले, कितीही वेगवेगळ्या पद्धतीने अनुभवले, तरी रामाच्या आदर्शांची उंची आणि रामायणातून मिळणारी जीवनमूल्ये यांची जागा कुठलाही भव्य चित्रपट घेऊ शकत नाही.

[लेखकाची टीप : हा लेख चित्रपट पाहिल्यानंतर मनात आलेल्या वैयक्तिक निरीक्षणांचा, आठवणींचा आणि विनोदी प्रतिक्रियांचा आहे.]

– शब्दांकन : डी. सदानंद

Pratik Tarkase is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...